बाकी सगळं बदलेल, पण तुमचा रंग कधी बदलणार नाही! ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर हल्ला

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहयाला व मेंदूला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

चरणप्रीत सिंग असे या 23 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शनिवारी रात्री त्याच्या पत्नीसह किंटोर अॅव्हेन्यू येथे आला होता. कार पार्क करून ते दोघे लाइट डिस्प्ले पाहण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आरोपी तेथे आले आणि त्यांनी कार येथे का पार्क केली म्हणून चरणप्रीतला जाब विचारला. तो बोलू पाहत असतानाच त्यांनी वांशिक टोमणे मारायला सुरुवात केली आणि शिवीगाळ करत थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांच्या हातात काही टोकदार वस्तूही होत्या. चरणप्रीतची पत्नी मदतीसाठी आरडाओरड करू लागल्यानंतर हल्लेखोर त्यांच्या कारमधून पसार झाले.

पार्किंगचे निमित्त झाले…

’पार्किंगवरून त्यांनी वाद सुरू केला. नंतर वांशिक टिप्पण्या करू लागले. शिवीगाळ केली. तुम्ही लोक शरीरातलं काहीही बदलू शकता, पण तुमचा रंग बदलू शकत नाही,’ असे चरणप्रीतने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ’अशी एखादी घटना घडते तेव्हा असं वाटतं की पुन्हा हिंदुस्थानात जावं,’ अशी भावना चरणप्रीत याने व्यक्त केली.