India Vs Canada – केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत कॅनडाच्या नागरिकांना हिंदुस्थानचा व्हिसा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर हिंदुस्थान आणि कॅनडामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडामधून हिंदुस्थानमध्ये येणाऱ्या नागरिकांना तुर्तास ‘व्हिसा बंदी’ घालण्यात आली आहे. पुढील निर्देशांपर्यंत व्हिसा सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

‘बीएसएल’ या आंतरराष्ट्रीय वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट एएनआयने शेअर केला आहे. दोन्ही देशातील राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर 2023 पासून हिंदुस्थानी व्हिसा सुविधा ही पुढील सूचना येईपर्यंत निलंबित करण्यात आली आहे. ही सूचना कॅनडातील इंडियन मिशनकडून देण्यात आल्याचे या वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

कॅनडाचा आरोप हिंदुस्थानने फेटाळला

कॅनडात लपलेल्या दहशतवादी हरदीप निज्जर याची हत्या करण्यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टी ट्रूडो यांनी केला होता. निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्यात येत असून त्याच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांचं खंडण केले असून हे सगळे प्रकार कॅनडातील वाढता खलिस्तानी दहशतवाद आणि उग्रवाद्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हिंदुस्थानी नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा

केंद्रातील मोदी सरकारने कॅनडातील रहिवासी असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारतर्फे कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांना सांगण्यात आलं आहे की, कॅनडात वाढत्या हिंदुस्थानविरोधी कारवाया आणि राजकीय पाठबळ असलेली हिंसा व तत्सम गुन्ह्यांकडे पाहता कॅडात राहणाऱ्या किंवा तिथे जाण्याचा विचार करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनी अतिशय सावध आणि सतर्क राहावं, असा सल्ला केंद्राने दिला आहे.

सध्या हिंदुस्थानी राजकीय व्यक्ती आणि हिंदुस्थानी नागरिक यांना लक्ष्य करणाऱ्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यात हिंदुस्थानविरोधी धोरणांचा निषेध करणाऱ्यांना विशेष लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांना हा सल्ला देण्यात येत आहे की, ते कॅनडातील त्या ठिकाणांवर प्रवास करू नये जिथे असे प्रकार घडत आहेत. तसंच, भारतीय उच्चायोग किंवा दूतावास कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कॅनेडियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असेल, असंही या अॅडव्हाजरीमध्ये सांगण्यात आलं आहे.

कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या