डॉ. संदेश गुल्हाणे यांची कमाल, अमरावतीचा तरुण स्कॉटलंडचा खासदार

डॉ.संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. मूळचे अमरावती शहरातील रहिवासी व सध्या स्कॉटलंड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश गुल्हाणे हे स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने अमरावतीसह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी प्रकाश व पुष्पा गुल्हाणे यांचा एकुलता एक मुलगा संदेश गुल्हाणे यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेले संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला.

2021 मध्ये डॉ. संदेश यांनी स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. स्कॉटलंड संसदेत निवडून गेलेल्या हिंदुस्थानी वंशाचे ते पहिलेच व्यक्ती आहेत.

डॉ. संदेश गुल्हाणे यांनी कोविड फ्रंटलाइनवर काम केल्यानंतर होलीरूड निवडणुकीत टॉरीजसाठी उभे राहण्याचे ठरविले. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी डॉ. संदेश गुल्हाणे यांचे मामेभाऊ महेश सुरंजे सांगतात की, ‘माझे मामा प्रकाश गुल्हाणे लंडन येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. 8 तारखेला डॉ. संदेश गुल्हाणे स्कॉटिश पार्लामेंटमध्ये निवडून आल्याची माहिती मिळताच आमचा आनंद द्विगुणीत झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या