
जयेंद्र लोंढे | मुंबई
हिंदुस्थानच्या अपंग क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इंग्लंडला धूळ चारून जागतिक ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली. शरीराने 40 टक्के अपंग असलेल्या या हिंदुस्थानी संघाने फक्त 18 टक्के अपंग असलेल्या इंग्लंडला अंतिम फेरीत हरवून अफाट अंगभूत कौशल्य जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींना दाखवून दिले. आता या जगज्जेत्यांना शारीरिकदृष्टय़ा आणखी सक्षम बनवण्यासाठी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन (अपंग) यांनी पाऊल उचलले असून याअंतर्गत जर्मनीतील ओटो बॅक या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता हिंदुस्थानातील निवडक 15 खेळाडूंना कृत्रिम हात व पाय लावले जाणार आहेत. याचा उपयोग त्यांना क्रीडांगणातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही होणार आहे.
35 लाखांचा खर्च
हिंदुस्थानच्या 15 खेळाडूंसाठी ओटो बॉक कंपनीकडून 35 लाखांचे हात व पाय ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनने मागवले आहेत. यासाठी अवाया कंपनीने आर्थिक सहकार्य त्यांना केले. तीन वर्षांचा करारही करण्यात आला आहे. यादरम्यान त्या साधनांची सर्व्हिसिंगही करण्यात येणार आहे.
पदाधिकार्यांचे प्रयत्न
हिंदुस्थानच्या अपंग खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी असोसिएशन पदाधिकार्यांकडून मेहनत करण्यात येत आहे. यामध्ये टी. पी. मिरजकर, दिनेश पाटील, उदय तांबे, अनिल जोगळेकर यांचा समावेश आहे. अपंग क्रिकेटला आर्थिक स्थैर्य व सन्मान मिळवून देण्यासाठी ते सातत्याने जिवाचे रान करीत आहेत.
चौरंगी मालिकेपासून होणार श्रीगणेशा
अपंग क्रिकेटपटू आगामी चौरंगी मालिकेमध्ये नव्या साधनांसह खेळताना दिसणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हिंदुस्थानमध्ये ही मालिका होणार आहे. त्यामध्ये यजमान हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व अफगाणिस्तान या देशांचा समावेश असणार आहे. ही मालिका हुबळी किंवा इंदूर यापैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे.




























































