
हिंदुस्थानचा एकूण प्रजनन दर प्रतिस्थापन पातळीपेक्षा खाली गेल्याने भविष्यात लोकसंख्या घटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता उद्योगपती इलॉन मस्क यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी हिंदुस्थानातील घटत्या जन्मदराकडे लक्ष वेधले. मस्क यांनी एका मीडिया अहवालाचा संदर्भ देत म्हटले की, हिंदुस्थानातील जन्मदर आता प्रतिस्थापन पातळीपेक्षा खाली गेला आहे. त्यांच्या मते, उच्च शिक्षित वर्गामध्ये हा कल काही वर्षांपूर्वीच दिसून आला होता. सध्या देशाचा एकूण प्रजनन दर प्रति महिला 1.9 इतका नोंदवला गेला आहे, तर लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी हा दर किमान 2.1 असणे आवश्यक मानले जाते.
अहवालानुसार, राजधानी दिल्लीतील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. येथे प्रजनन दर केवळ 1.2 इतका असून तो फिनलंडसारख्या विकसित देशांपेक्षाही कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, जन्मदरातील ही सातत्याने होत असलेली घट भविष्यात कामगारांची संख्या कमी होणे, वृद्ध लोकसंख्या वाढणे आणि आर्थिक वाढीवर परिणाम होणे यांसारखी आव्हाने निर्माण करू शकते. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (UNFPA) अहवालानुसार, हिंदुस्थानचा प्रजनन दर गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. मात्र, देशाची लोकसंख्या अजूनही 1.46 अब्जांहून अधिक असून हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.
UNFPA ने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाल्या असल्या तरी देशात मातामृत्यू, लैंगिक असमानता, बालविवाह आणि किशोरवयीन गर्भधारणा यांसारख्या समस्या अजूनही गंभीर आहेत. तज्ज्ञांच्या मते, घटत्या प्रजनन दराचे परिणाम तात्काळ दिसणार नसले तरी आगामी दशकांमध्ये त्याचा लोकसंख्या रचना, रोजगार बाजार आणि अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडू शकतो.
























































