
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी चमत्कारिक स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जीडीपीच्या विकासदराने 8.2 टक्क्यांपर्यंत उंच उडी मारली आहे, तर दुसरीकडे देशाचे चलन रुपया चक्क धाराशाही पडला आहे. एका डॉलरसाठी थेट 71 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. यामुळे इंधनदरवाढीसह महागाईचा फटका जनतेला रोज बसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा कोणता जादूटोणा केला आहे, असा प्रश्न अर्थतज्ञांसह सामान्य जनतेला पडला आहे.
– रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालामध्ये 2018-19 आर्थिक वर्षात जीडीपी विकासदर 7.4 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. ‘रॉयटर्स’च्या अर्थतज्ञांनी आणि देश-विदेशातील अर्थशास्त्र्ा अभ्यासकांनीही हिंदुस्थानचा जीडीपी विकासदर 7.6 पर्यंत असेल असा अंदाज वेळोवेळी व्यक्त केला आहे. मात्र, सर्वांनाच खोटे ठरवित मोदी सरकारने चमत्कार करून 2018-19 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा जीडीपी 8.2 टक्के केला आहे. चीनलाही मागे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. चीनचा जीडीपी 6.7 टक्के आहे.
रुपयाच्या पडझडीचा ऑगस्ट महिना
-संपूर्ण ऑगस्ट महिना रुपयाची पडझड होत आहे. महिन्याभरात रुपयाचे मुल्य 3.30 टक्क्यांनी खाली आले. शुक्रवारी रुपयाने निच्चांकीचा आणखी एक विक्रम केला. प्रति डॉलर 71 रुपये मोजण्याची वेळ आली. काही वेळाने 9 पैशांनी सावरला आणि रुपयाचे मुल्य 70 रुपये 91 पैशांपर्यंत स्थिरावले.
पेट्रोल-डिझेलसह सर्वच महागले
– रुपयाच्या पडझडीचा थेट फटका जनतेला बसत आहे. आयात महागली, परदेशातील शिक्षण आणि प्रवास महागला आहे.
– सर्वांत मोठा फटका पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बसत आहे. रोज इंधन दरवाढ भडकत आहे. रुपयाची घसरण, अबकारी कर आणि व्हॅटची वसुली यामुळे दरवाढ होत आहे.
– शुक्रवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 85.93 रुपये तर पुण्यात 85.58 रुपयांवर गेले होते. डिझेलचा दर मुंबईत 74.54 रुपये तर पुण्यात प्रतिलिटर 72.98 झाले होते.



























































