
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्यानंतर युट्यूबर रणवीर अलाहाबादीया (Ranveer Allahbadia) वादात सापडला आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई (Mumbai) आणि आसाममध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. यातच वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर रणवीर अलाहाबादीया हा आता नॉटरिचेबल झाला आहे. तसेच त्याच्या घराला कुलूप असून त्याने आपला फोनही बंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रणवीर अलाहाबादीया याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात बोलवलं होतं. त्याने आपला जवाब घरीच नोंदवण्यात यावा, अशी विनंती पोलिसांना केली. मात्र ही विनंती नाकारण्यात आली आणि तो चौकशीला हजर राहिला नाही. यानंतर पोलिसांनी त्याला दुसरे समन्स बजावले. मात्र यानंतरही तो चौकशीला न आल्याने आज मुंबई आणि गुवाहाटी पोलीस त्याच्या वर्सोवा येथील घरी पोहोचले. मात्र त्याच्या घराला कुलूप होतं आणि त्याचा फोनही बंद लागत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्यानंतर अटकेच्या भीतीने आज रणवीर अलाहाबादीया याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्याने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सध्या त्याला दिलासा देण्यास नकार दिला. वेळेचा अभाव असल्याचे तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.





























































