इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला मोठा धक्का! इंडोनेशियाचा संरक्षण करारातून काढता पाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणसोबतच्या युद्धात अडकलेल्या अमेरिकेला जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाने एक मोठा आंतरराष्ट्रीय धक्का दिला आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार इंडोनेशियाने मोडीत काढला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री या करारापासून पूर्णपणे मागे हटले असून आपण ज्या करारावर स्वाक्षरी केली होती, ती मानण्यासाठी आपण बांधील नाही, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच झालेला संरक्षण करार लागू करणे अनिवार्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दक्षिण चीन समुद्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी अमेरिकेने एप्रिल २०२६ मध्ये इंडोनेशियासोबत हा करार केला होता. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच जकार्ताने यातून हात काढून घेतल्याने अमेरिकेला मोठा राजकीय फटका बसला आहे.

हा निर्णय अमेरिकेसाठी अत्यंत घातक मानला जात आहे. कारण इंडोनेशिया हा दक्षिण चीन सागर आणि हिंद-प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी स्थित आहे. या मोक्याच्या ठिकाणाहून आशियान देशांवर सहज देखरेख ठेवता येणे अमेरिकेला शक्य झाले असते. चीनचा संपूर्ण व्यापार दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून होत असल्याने, तेथील चीनचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अमेरिकेला इंडोनेशियाची साथ अत्यंत आवश्यक होती. येथे अमेरिकेचे दबदबा कायम राहिला असता तर चीनच्या अडचणी वाढल्या असत्या.

इंडोनेशिया एकेकाळी अलिप्ततावादी चळवळीचा पुरस्कर्ता देश होता. मात्र २०२० नंतर अमेरिकेने त्याला आपल्या बाजूने वळवून घेतले होते. जो बायडन सरकारच्या काळात दोन्ही देशांमध्ये अनेक मोठे करार झाले होते आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही अमेरिकेला इंडोनेशियाकडून मोठ्या कराराची अपेक्षा होती, परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.