शीवमध्ये गटारात मुलीचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एका 16 दिवसीय नवजात मुलीचा शीवमधील गटारात मृतदेह सापडला आहे. गंभीर म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गटारातच मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.

किंग्ज सर्पल येथील सुंदर कमला झोपडपट्टीत हा प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी 16 दिवसांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी शीव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र बुधवारी तक्रारदार पालकांच्या घरामागे असलेल्या गटारात मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला असून गुह्याचा अधिक तपास सुरू केला आहे. ओळखीतल्यापैकी कोणीतरी हा प्रकार केला असावा असा पोलिसांना संशय असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.