तुम्हीच सांगा कसं जगायचं? पिठापासून मिठापर्यंत सगळेच महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चहा पावडर, खाद्यतेल, डाळी, दूध, भाज्या, फळांपर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरने तर महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले. कोटय़वधी लोकांच्या नोकऱया गेल्या. आता महागाईच्या महामारीने वेढले आहे. सांगा, कसं जगायचं, असा प्रश्न जनतेपुढे आहे.

गेल्या वर्षभरात खाद्यतेलांच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली. फोडणीच महागल्यामुळे किचनचे बजेट कोसळले. मे 2020मध्ये सूर्यफूल तेल प्रतिकिलो 110 रुपये होते. 2021मध्ये 172 रुपये किलो झाले. तब्बल 56 टक्के ही दरवाढ झाली. सोया तेल 100 रुपयांवरून 153 रुपये प्रतिकिलो झाले. ही दरवाढ 52 टक्के आहे. वनस्पती तेल 90वरून 131 रुपये झाले. पामतेल 86 रुपयांवरून 133 रुपयांपर्यंत वाढले. शेंगदाणा तेल 147 वरून 177 रुपये प्रतिलिटरपर्यंत महाग झाले.

‘प्रोटिन’ महाग

  • कोरोनाकाळात इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रोटिन आवश्यक आहे. पण सर्वांच्या किचनमधील महत्त्वाचा प्रोटिन घटक असलेल्या डाळीच्या किमती वर्षभरात 15 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.
  • भाज्या, फळे हेही इम्युनिटीवाढीसाठी महत्त्वाचे आहेत. पण याच्या दरात 6.6 टक्के वाढ झाली.

अमूल, गोकुळनंतर मदर डेअरी दूध महागले

‘अमूल’ने दूध दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढविले. त्यानंतर ‘गोकुळ’नेही दूध दरात दोन रुपये दरवाढ केली. आता ‘मदर डेअरी’ने दुधाचे भाव वाढविले आहेत.

चहा पावडरची 60 टक्क्यांपर्यंत दरवाढ

  • जनतेला आता चहा पिणेही महाग झाले आहे. देशात पहिल्यांदाच चहा पावडरमध्ये 40 ते 60 टक्क्यांपर्यंत विक्रमी दरवाढ झाली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे चहा महागला, असे टी बोर्ड ऑफ इंडियाने म्हटले आहे.
  • आसाम, दार्जिलिंगमध्ये चहाचे उत्पादन होते. गुवाहाटी येथे चहाच्या किंमतीत तब्बल 61 टक्क्यांनी वाढ झाली. येथे चहा 217 रुपये प्रतिकिलोवर गेला. सिलीगुडीमध्ये चहा पावडर प्रतिकिलो 204 रुपये झाली. ही 39 टक्के दरवाढ आहे.

पेट्रोल–डिझेल दरवाढीचा रोज नवा विक्रम

  • देशातील बहुतांशी भागात पेट्रोल 105 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 98 रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. इंधन दरवाढीचा रोज नवीन विक्रम होत आहे.
  • डिझेल दरवाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होतो. पर्यायाने अन्नधान्य, भाजी, फळे इतर वस्तूंच्या दरामध्ये वाढ होते.

गॅस दरवाढीचा भडका

  • पाच महिन्यांत घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांनी वाढ झाली आहे.
  • कोरोना महामारीत मे 2020 पासून पेंद्र सरकारने अचानक सबसिडी बंद केली. त्यामुळे विना अनुदानित पिंमतीतच गॅस सिलिंडर खरेदी करावे लागत आहेत.

बैलगाडी कोसळली; काँग्रेस नेते पडले

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन केले. अनेक ठिकाणी सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात अँटॉप हिल येथे बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडीवर 15-20 नेते स्वार झाल्याने बैलगाडी मोडली व नेतेमंडळी जमिनीवर कोसळली. बैलगाडीचे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.