
बाळ तोरसकर,[email protected]
काही खेळ देश-विदेशात खेळूनसुद्धा त्यांना राजमान्यता मिळालेली नाही. त्यापैकीच एक खेळ म्हणजे भोवरा. भोवरा तसा कधीही खेळता येतो. या खेळासाठी लहान व सपाट जागा उपलब्ध झाली की, झाले. मग हा खेळ लगेच खेळता येतो.
लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे खेळ जन्माला आले. सुरुवातीला हे खेळ हौस म्हणून खेळले गेले तर काही खेळ व्यावसायिकपणे पुढे आले. काही खेळ मात्र मोठे होऊ शकले नाहीत. काही खेळ देश-विदेशात खेळूनसुद्धा त्यांना राजमान्यता मिळालेली नाही. त्यापैकीच एक खेळ म्हणजे भोवरा. भोवरा हा खेळ तसा हिंदुस्थानी खेळ म्हणून ओळखला जात असला तरी चीन व जपान येथेसुद्धा हा खेळ फार प्राचीन काळापासून खेळत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवरा खेळत असल्याचे उल्लेख सापडतात. चौदाव्या शतकानंतर युरोपात भोवरा खेळाचा उल्लेख आवर्जून आढळतो. साधारणपणे मुलांचा एक आवडता खेळ म्हणून भोवऱयाकडे पाहिले जाते. असे असले तरी मुलीसुद्धा हा खेळ खेळताना आढळतात. भोवरा तसा कधीही खेळता येतो. या खेळासाठी लहान व सपाट जागा उपलब्ध झाली की, झाले. मग हा खेळ लगेच खेळता येतो.
पूर्वी भोवरे हे साग, शिसम किंवा आंबा या लाकडापासूनच बनवले जात असत. कालांतराने पत्र्याचे व रंगीबेरंगी प्लॅस्टिकचे भोवरेसुद्धा पुढे आले. लाकडाचे भोवरेसुद्धा वेगवेगळ्या आकर्षक रंगांत आल्याने बाजारात वेगवेगळ्या रंगांचे भोवरे खरेदी करण्यासाठी नेहमीच लहान मुलांची झुंबड उडालेली दिसते. भोवरा हा वरच्या बाजूला गोलसर जाड तर खालच्या बाजूला बारीक निमुळता होत जातो. निमुळत्या टोकात जाड लोखंडी तार बसवली जाते. या तारेला आरी असे म्हणतात तर वरच्या भागास मोगरी असे संबोधतात. याला शंकाकार स्वरूप असेही म्हटले जाते. भोवरा फिरवण्यासाठी दोरीचा वापर केला जातो. ती दोरी भोवऱयाभोवती घट्ट बसावी किंवा निसटू नये म्हणून भोवऱयाभोवती आरीपासून वरच्या भागाकडे गोल खाचा किंवा काप केलेल्या असतात. त्यामुळेच त्यावर भोवरा फिरवण्याची दोरी घट्ट बसते. या छोटय़ा जाडीच्या दोऱया वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध असतात. ही दोरी भोवऱयाच्या निमुळत्या भागाकडून म्हणजेच आरीकडून वरच्या भागाकडे गुंडाळून त्याचे एक टोक हातात अशा पद्धतीने धराव की, भोवरा खाली सोडताना त्याला झटका बसावा व भोवरा स्वतःभोवती गोल फिरावा. हातातील या दुसऱया टोकाला एक गाठ मारली जाते, जेणेकरून ही दोरी सहजासहजी हातातून निसटून जाणार नाही. या दोरीला जाळी असे म्हणतात, तर भोवऱयाच्या फिरण्याला नाद असेही म्हटले जाते.
आपण नेहमी पाहतो ते भोवरे वेगळे. याव्यतिरिक्त वेगळा भोवरासुद्धा असतो. नेहमीच्या भोवऱयात एकच बाजू निमुळती असते. काही भोवरे दोन्ही बाजूंना निमुळते असतात व त्या दोन्ही टोकांना आरी असतात. या दोन टोकांना आरी असलेल्या भोवऱयांना दुआरी भोवरा असे संबोधले जाते. भोवरा खेळताना एकेक जिल्ही किंवा दोन-दोन जिल्ही असे खेळाचे प्रकार होत. जिल्ही म्हणजे साधारण दोन ते अडीच फुटांचे वर्तुळ होय. एक किंवा दोन वर्तुळांत भोवरा ठेवून जिल्हीतील भोवऱयाला टोले मारून किंवा जाळीने म्हणजे दोरीने उडवून हा खेळ खेळला जातो. या भोवऱयाला मुले स्वतःच्या भोवऱयांनी टोले मारून बाहेर काढतात. त्यावेळी आरीने जे घाव घातले जातात त्याला गुब्बा असेही संबोधतात.
कधी कधी दोन खेळाडू एकाच वेळी भोवरा फिरवण्यासाठी जमिनीवर सोडतात व ज्याचा भोवरा अगोदर थांबतो त्याला दुसऱया खेळाडूला हरल्याबद्दल आपला भोवरा द्यावा लागतो. भोवऱयाचा निमुळता भाग व वरचा भाग (डोके) यांचा समतोल सांभाळत आरीवर भोवरा जमिनीवर छानपणे सोडण्याची कला मात्र सरावानेच जमते. जर ही कला व्यवस्थित जमली तरच भोवरा जमिनीवर जास्तीत जास्त वेळ फिरत राहतो अन्यथा हरण्याची भीतीच जास्त असते. काही वेळा भोवरा जमिनीवर पडू न देता झटका किंवा उसळी देऊन तळहातावर घेण्याची एक वेगळीच कला आहे. काही जण जमिनीवर फिरत असलेला भोवरा हातचे मधले बोट व अंगठय़ाजवळील बोटाच्या मधून तळहातावर घेतात. मात्र यासाठी नियमित सरावाची गरज असते, तर काही जण जमिनीवरील फिरता भोवरा तळहातात घेऊन पुन्हा जमिनीवरसुद्धा सोडतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने भोवरा खेळता येतो.
जर आपणांस भोवरा नीट खेळता येत नसेल किंवा सराव नसेल तर मात्र हाच भोवरा आरीवर न फिरता आडवा जमिनीवर फिरतो व आपली फजिती होते. काही जण एवढा सराव करतात की, ते जसे आरीवर भोवरा फिरवतात तसेच उलटासुद्धा सहज फिरवतात व या दोन्ही प्रकारात छान छान भास आकृती आपणांस पाहायला मिळतात. हा खेळ खेळताना आपल्याला आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर आपणांस विविध व्यायामसुद्धा आपल्या शरीराला मिळतात. या खेळामुळे हाताला व कमरेला विविध व्यायाम मिळतात व त्याचबरोबर आपल्यात चपळतासुद्धा असावी लागते. सराव नसेल तर आरीने हाताला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पावसात भोवरा नीट खेळा व आनंद मिळवा.






















































