
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला जवान आपल्या गावी येताच त्याचे ग्रामस्थांनी फटाके वाजवून जोरदार स्वागत केले. या सत्काराने भारावलो अशी प्रतिक्रिया ऋषिकेश आंधळे या जवानाने व्यक्त केली. या बाबत अधिक माहिती अशी कि तालूक्यातील जवखेडे खालसा येथील ऋषिकेश आंधळे हा सैन्य दलामध्ये पॅराकमांडो फोर्स दलात गेल्या चार वर्षापूर्वी दाखल झाला असून,सध्या तो काश्मीर खोऱ्यात अतिसंवेदनशील भागात असलेल्या सोफियान येथे देशसेवेत कार्यरत आहे. शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी या जवानाच्या बटालियनला मेमेनडर गावामध्ये अतिरेकी घुसल्याची खबर मिळाल्याबरोबर ऋषिकेश आंधळे यांच्यासह १७ जवांनाची फौज अतिरेक्यावर कारवायी करण्यासाठी आर्मीच्या गाडीत निघाली असता पहाडी भागामध्ये सदर गाडीला सुरूंगाच्या स्फोटात अतिरेक्यांनी उडवले. या स्फोटात गाडी पलटी होऊन अपघात झाल्यामुळे १७ जवान जखमी झाले, त्यांच्यावर एक महिना सैनिक दवाखान्यात उपचार केल्यानंतर विश्रांतीसाठी घरी पाठविण्यात आले.
ज्या दिवशी ऋषिकेश आंधळे घरी आले त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. आंधळे गावात येत असल्याची माहिती जवखेडे खालसा येथील युवक अमोल वाघ व अॅड.वैभव आंधळे यांना समजताच त्यांनी ऋषिकेश आंधळे यांच्या सत्काराचे आयोजन केले. आंधळे गावात येताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत व मिरवणूक काढत आंधळे यांचे स्वागत करण्यात आले. या नंतर ऋषिकेश आंधळे व गावातील आजी व माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमास मंत्रालयातील प्रधान सचिवांचे विशेषकार्यकारी आधिकारी डॉ.बाबासाहेब राजळे,ठाणे जिल्हा येथील पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, पाथर्डी चे पो. निरी. रमेश रत्नपारखी हे उपस्थित होते, यावेळी डॉ.राजळे यांनी तरूणांनी सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न करावेत व गावामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय सुरू करावेत त्यासाठी लागणारे पुस्तके मी स्वतः देईल असे आश्वासन दिले. तर या सत्काराने आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया ऋषिकेश आंधळे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास पोपटराव आंधळे, अमोल वाघ, अॅड. वैभव आंधळे, अॅड. राजेंद्र कासार उपस्थित होते.



























































