
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्र राज्य बोर्डातील शालेय खेळाडूंवर गेली अनेक वर्षे अन्याय होत आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या विभागीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डातील मराठी, इंग्रजी आणि इतर भाषिक शाळांतील होतकरू व गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासूनही त्यांना बहुतांशी वेळा दूरच राहावे लागत आहे.
निवेदन दिल्यास पुढचा निर्णय घेऊ – मोटे
या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाचे जयकुमार दुबळे व नागेश मोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेली अनेक वर्षे महाराष्ट्र बोर्डाच्या स्पर्धांमधून सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील खेळाडू खेळताहेत, मात्र महाराष्ट्र बोर्डाशी निगडीत असलेले क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, क्रीडा शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ व पालक यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिल्यास आम्हाला याचा विचार करता येईल. तसेच त्यानंतर अंतिम निर्णयही घेतला येईल.
गरीब खेळाडू वंचित
सीबीएसई व आयसीएसई बोर्डातील खेळाडू हे श्रीमंत घराण्यातील असतात. त्यांना कुटुंबाकडून तसेच बोर्डाकडून अत्याधुनिक सोयीसुविधा सहज उपलब्ध होत असतात. तसेच दोन्ही बोर्डांच्या स्वतंत्र स्पर्धाही होतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्र बोर्डातील गरीब मुलांवर अन्याय होत आहे. या बोर्डातील मुलांना फक्त एकाच स्पर्धांमधून आपली चुणूक दाखवता येते. महाराष्ट्र शासनाने यावर लवकरच तोडगा काढायला हवा, असे स्पष्ट मत महाराष्ट्र क्रीडा धोरण समितीतील अविनाश ओंबासे यांनी व्यक्त केले.
कल्याणमध्ये आज बैठक
महाराष्ट्र बोर्डातील स्पर्धांमध्ये सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या खेळाडूंच्या समावेशाला विरोध करण्यासाठी कल्याणमध्ये बुधवार, 10 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात पार पडणार असून यावेळी ठाणे जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, मुख्याधापक संघ, क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटना व क्रीडाप्रेमींची उपस्थिती असणार आहे.
विभागीय, जिल्हा, राज्य स्पर्धेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या खेळाडूंचा समावेश
सीबीएसई व आयसीएसईच्या स्वतंत्र स्पर्धा
सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या खेळाडूंना आपली चुणूक दाखवण्यासाठी दोन संधी मिळत आहेत. सीबीएसई बोर्डातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच आयसीएसई बोर्डाकडून स्वतंत्र स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. याचसोबत त्यांना महाराष्ट्र बोर्डातील स्पर्धांमध्येही सहभागी होता येते. महाराष्ट्र बोर्डातील खेळाडूंना फक्त आणि फक्त आपल्याच बोर्डातील स्पर्धांमधून खेळावे लागते. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येते.




























































