
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवडीच्या टीबी रुग्णालयातील तीन नर्सच्या निलंबनावरून आज पालिका सभागृहात आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी रुग्णालयातील नर्सच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचून निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे सांगितले. तर सदस्यांनी डॉक्टरांची मनमानी आणि गैरकारभार उघड केला. याची गंभीर दखल घेत टीबी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि नर्सच्या ‘कारभार-वर्तणुकी’ची चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करा, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.
शिवडी क्षयरोग रुग्णालयातील तीन नर्सवर अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी पालिकेच्या महासभेत हरकतीचा मुद्दा मांडून निलंबन मागे घेण्याची मागणी केली. या रुग्णालयात डॉक्टर नर्सना मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉक्टर गंभीर रुग्णांना बेकायदेशीरपणे रुग्णालयाबाहेर नेत असल्याने रोग फैलावण्याचा धोका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, साधना माने, डॉ. अर्चना भालेराव, राजुल पटेल, सदानंद परब यांनी चर्चेत सहभाग घेत डॉक्टरांसह नर्सच्या वर्तणुकीची चौकशाची मागणी केली.
म्युनिसिपल कामगार सेनेचे आंदोलन
तीन नर्सच्या निलंबनाविरोधात आज म्युनिसिपल कामगार सेनेच्या वतीने शिवडीच्या रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर नर्सेसनी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेऊन अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे व डॉ. अमर पवार यांच्या निलंबनाची मागणी केली. तसेच नर्स रूपाली पवार, प्रीती सातवसे व शुभदा परब यांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी केल्याचे म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.
विरोधकांचे राजकारण; रुग्णाला घेऊन सभागृहात प्रवेश
पालिका रुग्णालयात येणाऱया गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी शिवसेनेने डॉक्टरांसह नर्सच्या वर्तणुकीची चौकशीची मागणी केली असताना विरोधकांनी मात्र कोणतेही पुरावे सादर न करता नर्सेसकडून रुग्ण आणि नातेवाईकांना वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी टीबीची लागण झालेल्या एका पाच वर्षांच्या चिमुरडीला सभागृहात उचलून आणले. कप्तान मलिक यांच्या वर्तणुकीचा सर्वपक्षीयांनी जोरदार निषेध केला. शिवसेनेने मलिक यांचे निलंबन करण्याची मागणी केली.
शिवडी टीबी रुग्णालयात मी सरप्राइज व्हिजिट दिली असता या ठिकाणी नर्सेसकडून रुग्णांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे निदर्शनास आले. गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष करून नर्सेस, वॉर्डबॉय, सिक्युरिटी गार्ड गप्पागोष्टीत रमलेले असतात. अनेक ठिकाणी प्रचंड अस्वच्छताही आढळली. प्रत्यक्ष भेट दिली असता नर्सेसचा बेजबाबदारपणा निदर्शनास आल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली.
– आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त
summary- inquiry of treatment of shivdi tb hospital staff


























































