मोदी सरकारच्या काळात रुपया 42 टक्क्यांनी घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
RUPEE DOLLAR

हिंदुस्थानी रुपयाच्या किंमतीत गेल्या काही काळापासून ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नवा विक्रमी नीचांक गाठल्याच्या बातम्या रोज प्रसिद्ध होत आहेत. रुपयाची किंमत घसरणे ही काही नवीन गोष्ट नाही आणि ती स्वातंत्र्योत्तर काळात बरीच घसरली आहे, पण त्याची अनेक कारणे आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून, रुपयाचे अवमूल्यन सुमारे 42 टक्क्यांनी झाले आहे, जे खूप जास्त आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या डेटानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्या दिवशी म्हणजेच 26 मे 2014 रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 58.58 वर बंद झाला आणि आज म्हणजेच ऑक्टोबर 20, 2022 रोजी रुपया 83.12 च्या पातळीवर पोहोचला, जो 41.89 टक्क्यांनी जास्त आहे. इतकेच नाही तर 3 मे 2004 रोजी अमेरिकन डॉलरची किंमत 44.97 रुपये होती आणि त्यानंतरच्या 10 वर्षांत (58.58 पर्यंत पोहोचेपर्यंत) म्हणजे 30.26 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली. एनडीटीव्हीने हे वृत्तप्रसिद्ध केले आहे.

आता गेल्या आठ वर्षांतील रुपयाची घसरण ऐतिहासिक असून, मोदींच्या काळात सुमारे 42 टक्के घसरणीसह 83 रुपयांची पातळी ओलांडली आहे. बुधवारी परकीय चलन व्यवहारादरम्यान, रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 83 ची पातळी ओलांडली होती, परंतु तो 82.37 वर बंद झाला. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा व्यवहारादरम्यान 83 रुपयांची पातळी ओलांडून 83.12 ही नीचांकी पातळी गाठली आहे.

2 मे 2022 रोजी रुपयाची किंमत 76.43 रुपये होती आणि रुपया एप्रिलपासून याच पातळीवर राहिला होता. 2 जून 2022 पर्यंत, ते सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरले आणि 77.58 वर पोहोचले. यानंतर, 1 जुलै 2022 पर्यंत, जूनच्या तुलनेत 1.95 टक्क्यांनी घट झाली आणि ती 79.09 वर पोहोचली. ऑगस्टपर्यंत, ही घसरण काहीशी थांबली आणि 1 ऑगस्ट 2022 रोजी रुपयाने 79.16 चा स्तर गाठला, संपूर्ण महिन्यात केवळ 0.08 टक्क्यांनी घसरला.

यानंतर, 1 सप्टेंबर 2022 रोजी तो 79.39 वर पोहोचला होता आणि गेल्या एका महिन्यात एकूण 0.29 टक्के घट नोंदवली गेली. 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत, रुपया पुन्हा एकदा 2.96 टक्क्यांनी घसरला आणि 81.74 वर बंद झाला. आता गेल्या 19 दिवसांत तो 1.68 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो 83.12 या त्याच्या नीचांकी पातळीवर आहे.