इन्स्टाग्रामचा मोठा बदल! 10 वर्षांनंतर ब्रँडने बदलला आपला ‘वर्डमार्क लोगो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने (Instagram) तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या लोगोमध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने त्यांच्या मुख्य आयकॉनमध्ये कोणताही बदल न करता, फक्त ॲपवर वरच्या बाजूला दिसणाऱ्या ‘वर्डमार्क’ म्हणजेच नावाच्या डिझाईनला नवीन रूप दिले आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी थ्रेड्स आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या बदलाची अधिकृत माहिती दिली आहे.

हा नवीन वर्डमार्क पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, शार्प आणि मॉडर्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जुन्या डिझाईनची मांडणी कायम ठेवत यामध्ये काही वळणे आणि नवीन फॉन्ट स्टाइलचा वापर करण्यात आला आहे. या नव्या वर्डमार्क लोगोमध्ये जुन्या अक्षरांच्या रचनेत आधुनिक बदल करून त्याला अधिक आकर्षक बनवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंग्रजीतील ‘s’, ‘r’ आणि ‘g’ या अक्षरांना अधिक वळणदार (cursive curves) आणि स्टायलिश रूप देण्यात आले आहे. इंस्टाग्रामचा हा जुना कर्सिव्ह-स्क्रिप्ट लोगो 2013 मध्ये डिझाईन करण्यात आला होता, ज्यामध्ये गेल्या एका दशकात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

इन्स्टाग्रामच्या या नव्या वर्डमार्कमधील बदलावर सोशल मीडियावर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सना हा नवा आणि आधुनिक फॉन्ट खूप आवडला आहे, तर दुसरीकडे अनेकांनी यावर टीका करत खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. नव्या लोगोमधील ‘r’ हे अक्षर ‘z’ सारखे दिसत असल्यामुळे अनेकांनी यावर मीम्स बनवले आहेत. त्यामुळे हा नवा लोगो आता ‘Instagram’ ऐवजी ‘Instagzam’ (इन्स्टॅग्झॅम) असा वाचला जात असल्याची जोरदार चर्चा इंटरनेटवर सुरू आहे

अनेक युजर्सनी जरी फॉन्टवर टीका केली असली तरी, नव्या डिझाईनमुळे इन्स्टाग्रामची मूळ ओळख टिकून राहिल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बदलातून मेटा (Meta) मालकीच्या या प्लॅटफॉर्मने भविष्यातील नव्या पिढीसाठी एक नवा आणि सुटसुटीत दृष्टिकोन स्वीकारला आहे. या वर्डमार्क बदलानंतर आता कंपनी भविष्यात ॲपमध्ये आणि आयकॉनमध्ये आणखी काही मोठे डिझाईन अपडेट्स आणणार का, याकडे टेक विश्वाचे आणि युजर्सचे लक्ष लागून राहिले आहे.