मुलींचे फोटो मॉर्फ करून ब्लॅकमेल करत होता तरुण, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इन्स्टाग्रॅमवर एक तरुणाने मुलींचे अश्लील फोटो बनवले होते. हे फोटो बनवून तो मुलींना ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला गुजरातमध्ये अटक केली आहे.

गुजरातच्या भावनगरमध्ये अल्फाज अनवर अली जमानी हा 20 वर्षीय तरुण 12 नापास आहे. त्याने इन्स्टाग्रॅमवर 17 फेक अकाऊंट बनवले होते. इन्स्टाग्रॅमवरील अनेक मुलींचे फोटो डाऊनलोड करून त्याने मॉर्फ केले होते. मुलींचे साधे फोटो त्याने अश्लील बनवले होते. नंतर हे फोटो त्या मुलीला पाठवून तो ब्लॅकमेल करत होता. मुलींना तो नग्न फोटो आणि व्हिडीओ पाठवायला प्रवृत्त करायचा. मुलीही घाबरून त्याला फोटो आणि व्हिडीओ पाठवत असे. असे करून त्याने 700 मुलींना फसवले होते. त्यात अल्पवयीन मुलींचाही समावेश होता.

नंतर मुंबई सायबर पोलिसांकडे एक तक्रार आली. तेव्हा पोलिसांनी तपास केला असता हा मुलगा गुजरातचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुजरातमधून त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. अल्फाज फक्त त्यांना ब्लॅकमेल करत नव्हता तर त्यांचा विनयभंगही करायचा. 700 मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने पोलिसांनी अल्फाजविरोधात पोस्कोअंतर्गत कारवाई केली आहे.

अल्फाज इन्स्टाग्रॅमद्वारे मुलींचा शोध घ्यायचा. त्यांचे फोटो मॉर्फ करून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यांच्याकडून इन्स्टाग्रॅमचा आयडी आणि पासवर्ड घेऊन इतर मुलींशी ओळख करायचा. नंतर त्या मुलींनाही तो ब्लॅकमेल करायचा. यापूर्वी पुणे पोलिसांनी अशाच गुन्ह्यात त्याला अटक केली होती. आपले 17 फेक इन्स्टाग्रॅम अकाऊंट असल्याची कबुली त्याने दिली. अल्फाजने हे फोटो कुठल्या पॉर्न साईटला विकले की नाही याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या