मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कोविड विमा संरक्षण; भारतीय कामगार सेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विमानतळावर सेवा पुरविणाऱ्या सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना येत्या 1 जूनपासून कोविडसाठी अतिरिक्त विमा संरक्षण दिले जाणार आहे. भारतीय कामगार सेनेचे  चिटणीस संजय कदम यांच्या मागणीमुळे हे विमा संरक्षण दिले जाणार असून याबरोबरच कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसदाराला पुढील एक वर्षासाठी दरमहा 25 हजार रुपयांची मदतदेखील करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येथे काम करणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गाची सुरक्षा आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांनी सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडे यासंदर्भात मागणी केली होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली असून त्यानुसार कंपनीकडून अधिकृत पत्रदेखील नुकतेच संजय कदम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

यावेळी चिटणीस संतोष कदम, सहचिटणीस राजा ठाणगे, सूर्यकांत पाटील, कार्यकारिणी सदस्य नीलेश ठाणगे, व्यवस्थापनाकडून तौसिफ खान, सौरव दळवी, विजय लक्ष्मी उपस्थित होते. त्याचबरोबर कमिटी सदस्य सुजित कारेकर, नरेंद्र दळवी, सुदर्शन वारसे, संतोष लखमदे, हेमंत नाईक, नितीन कदम, हरिश्चंद्र कराळे, रवी शेलार, अनिल गुरव, उमेश सुरती, रमेश रसाळ, संदीप चाळके उपस्थित होते.

मान्य झालेल्या मागण्या

  • मृत कर्मचाऱ्याला पाल्य असल्यास 2500 रुपये आणि दोन पाल्य असल्यास 5000 रुपये प्रत्येक वर्षाला देण्यात येईल. (बारावीपर्यंत)
  • मृत कर्मचाऱ्याचा कुटुंबातील एका व्यक्तीस शिक्षणाच्या पात्रतेनुसार पंपनीमध्ये नोकरी देण्यात येईल.
  • कोरोनाचा संसर्ग झाल्यास कर्मचाऱयांना संसर्ग झालेल्या दिवसांपासून पुढील 15 दिवसांच्या पगाराइतकी रक्कम देण्यात येईल.