>> डॉ. धीरज कुलकर्णी
रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर हे गेल्या शतकातील चित्रकलेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेनंतर हिंदुस्थानींना आधुनिक चित्रकलेचे शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. हे शिक्षण घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोचवणारे ते आद्य चित्रकार. सन 1890 साली जेव्हा त्यांनी जेजेमध्ये प्रवेश घेतला तेव्हाही समाजात व कुटुंबात चित्रकलेविषयी अनुकूल परिस्थिती नव्हती. आपल्या या कलाप्रवासाविषयी त्यांनी ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकात लिहिले. मॅजेस्टिक प्रकाशनाने 2018 साली हे पुस्तक पुन्हा संपादित केले. सुहास बहुळकर, दीपक घारे यांनी या नव्या पुस्तकाबद्दल विशेष मेहनत घेतली आहे. या पुस्तकात धुरंधर यांनी चित्रकला अभ्यापामातील विविध विषयांची पद्धतशीर आणि पूरक माहिती दिलेली आहे.
धुरंधर यांनी या पुस्तकात केवळ जे. जे. स्कूलमधील आपली कारकीर्द आणि चित्रकलेतील प्रवास याविषयी लिहिलं आहे, वैयक्तिक आयुष्यातील अगदी महत्त्वाचे प्रसंग वगळता त्याबद्दल फार लिहिलेलं नाही. त्यामुळे त्यांचा कलाप्रवास हा त्या काळातील मोठाच दस्तऐवज झाला आहे.
एकोणिसाव्या शतकातील हिंदुस्थान, तत्कालीन ब्रिटिश शासन पद्धती, ब्रिटिश कलाकार व गुरू, त्यांची वागण्याची करडय़ा शिस्तीची पद्धत यामुळे विद्यार्थी उत्तम न घडते तरच नवल. आपल्या शिक्षणाच्या काळातील इंग्रज गुरूंबद्दल धुरंधर कृतज्ञतापूर्वक लिहितात. चित्रकला शिक्षण आटपत असतानाच स्टुडन्ट टीचर म्हणून धुरंधर यांची नियुक्ती कला महाविद्यालयात झाली. त्यांना स्वतंत्र व्यवसाय करायचे मनात असूनदेखील केवळ ग्रिफिथ यांच्या सांगण्यामुळे त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला, पण या निर्णयामुळे पूर्ण देशाचा फार फायदा होऊन हजारो उत्तमोत्तम विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले. कला महाविद्यालयातील शिक्षक ते प्रिन्सिपल हा त्यांचा प्रवास सोपा अजिबात नव्हता.
धुरंधर यांचे प्रथम लग्न झाल्यानंतर पुत्रप्राप्ती झाली, नंतर लगेच प्लेगची साथ सुरू होऊन त्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दुसऱया लग्नापासून त्यांना एक मुलगी झाली, ती म्हणजे चित्रकार अंबिका धुरंधर. यांनीही आपल्या चित्रकलेच्या अभ्यासाबद्दल पुस्तक लिहिले आहे.धुरंधर यांनी पुस्तकात कॉलेज आणि संस्था यात चालणाऱया हेवेदावे आणि राजकारणाचेही चित्रण केले आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धातील बराच भाग हा या राजकारणाशी लढण्याचे आणि त्यातून मार्ग काढत चित्रकला शिकवणे आणि जोपासणे याच्या वर्णनात खर्ची पडला आहे, पण ते लेखक टाळू शकला नाही. धुरंधर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली.
धुरंधर यांचे सर्वच काम हे ब्रिटिश अमदानीत झालेले. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी कधीही सािढय सहभाग घेतला नाही, परंतु त्यास विरोधही केला नाही. स्वातंत्र्य लढय़ात सहभागी न होता, एतद्देशीय विद्यार्थ्यांना जातधर्म न पाहता त्यांनी चित्रकला शिकवून तरबेज केले. हेही मोठे समाजकार्यच म्हणता येईल. आधुनिक हिंदुस्थानी चित्रकलेतील आद्य चित्रकार आबालाल रेहमान यांचा वारसा धुरंधर सांगतात. तसेच समकालिनांमध्ये हळदणकर, सातवळेकर, कीर्तिकर, सरदेसाई, व्ही. व्ही. वाघ, विनायकराव करमरकर अशा अनेकांचा उल्लेख त्यांनी केला आहे. अभ्यासासाठी निघणाऱया बऱयाच सहलींचा यात उल्लेख आहे. या सहलींच्या दरम्यान घडलेल्या गमती जमती, अडचणी, याबरोबरच तिथे केलेल्या अभ्यासाचे बारकावे धुरंधर यांनी थोडक्यात सांगितले आहेत.
यात सांगण्यासारखे म्हणजे अजिंठय़ाला सहल गेली असताना दूर डोंगरावर बसून अजिंठय़ाचे चित्र काढायचे काम सुरू होते. तेव्हा वाघाच्या डरकाळ्यांनी सर्वांची गाळण उडाली आणि तसेच अपूर्ण चित्र घेऊन ते परत आले व आल्यावर चित्र पूर्ण केले. अजिंठय़ाला त्या काळी घनदाट जंगल असून त्यात बरेच वाघ होते. पुस्तकात शेवटच्या भागात कौटुंबिक व मित्रवर्गाचे फोटो आहेत. तसेच काही पत्रव्यवहारही प्रकाशित केला आहे. सोबतच अनेक मित्रांनी दिलेल्या गद्य व पद्यरूपी शुभेच्छा दिसतात. पुस्तकाचे पुनश्च संपादन करत असताना धुरंधर यांची गाजलेली व महत्त्वाची चित्रे यांच्या प्लेट्स शेवटी दिल्यामुळे पुस्तक देखणे व महत्त्वपूर्ण झाले आहे.
यानंतर काही परिशिष्टे जोडली आहेत. यात धुरंधर यांचा चरित्रपट, कुटुंबीय व आप्त यांच्या नजरेतून चित्रकार धुरंधर, समकालीन विद्यार्थी व चित्रकारांना उमजलेले धुरंधर, नी. म. केळकर यांचा स्वतंत्र लेख आणि धुरंधर यांची इल्सट्रेशन्स असलेली पुस्तके यांचा समावेश आहे.