
दक्षिण सूदानमध्ये तेल कामगारांना घेऊन जाणारे छोटे विमान उड्डाण घेत असताना कोसळल्याची घटना घडली. या अपघातात एका हिंदुस्थानी नागरिकासह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. युनिटी राज्यातील तेल क्षेत्र विमानतळावरुन राजधानी जुबाकडे जात असताना बुधवारी ही दुर्घटना घडली.
मयत व्यक्ती प्रवासी ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनी (जीपीओसी) चे तेल कामगार होते, अशी माहिती सूदानमधील मंत्री गॅटवेच बिपल यांनी दिली. मृतांमध्ये दोन चिनी नागरिक आणि एका हिंदुस्थानी नागरिकाचा समावेश आहे. मृतांमध्ये अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी देखील आहेत, असे राष्ट्रपती साल्वा कीर यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप कळले नाही. याबाबत तपास सुरू आहे.
































































