International Womens Day 2024 : बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकाने महिलांचा केला विशेष सन्मान, सर्व स्तरातून होत आहे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात मोठ्या उत्साहात महिला दिवस (8 March) साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकाने वेगळ्या पद्धतीने महिलांचा विशेष सन्मान केला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधत बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकाने महिलांचा विशेष सन्मान करत रेल्वे स्थानकाची संपूर्ण जबाबदारी महिलांच्या खांद्यावर सोपवली होती. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांचे (RPF) महिला पथक सुद्धा सज्ज करण्यात आले होते. समस्तीपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन ऑपरेशन, तिकीट तपासणी आणि रेल्वेच्या सुरक्षेसह सर्व कामे महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी महिला विशेष दानापूर-जयनगर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन सुद्धा चालवण्यात आली. या ट्रेनचे लोको पायलट कांचन कुमारी तर सहाय्यक लोको पायलट म्हणून रीना कुमारी यांनी जबाबदारी स्वीकारली. तसेच ट्रेन गार्ड आणि ट्रेन सुरक्षेची जबाबदारी सुद्धा महिलांच्या खांद्यावर होती.

आरपीएफपासून ते तिकीट काउंटरपर्यंतच्या सर्व जबाबादाऱ्या महिलांच्या खांद्यावर होत्या.  समस्तीपूर स्थानकावर आयोजित कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) विनय श्रीवास्तव यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 14 लोको पायलट या महिला असून ही एक सन्मानाची बाब आहे. तसेच दानापूर ते जयनगर इंटरसिटी एक्सप्रेसच्या महिला लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने चालवली. तसेच महिला कर्मचाऱ्यांना ऑपरेशन आणि सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. तसेच आरपीएफ पोलीस स्थानकाची धुरा सुद्धा महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती आहे. दरभंगा स्थानकावर तिकीट तपासणीसाठी महिला तिकीट तपासणीस तैनात करण्यात आली आहे.