
>> संकलन – निनाद पाटील
परवा अचानक आमच्या घरातले वॉशिंग मशीन बिघडले व सोनूची मला प्रकर्षाने आठवण झाली आणि हेही आठवले की, मी त्याचे कधीही आभार मानले नाहीत. पण आता मानतो मित्रा. थँक्स डियर सोनू…! सांगताहेत अभिनेता, लेखक, दिग्दर्शक निखिल रत्नपारखी.
मी दारावरची बेल वाजवली. साधारण धिप्पाड शरीरयष्टीचा, मठ्ठ चेहऱयाचा आणि निस्तेज डोळय़ांच्या एका सोडशवर्षीय मुलाने दार उघडले व घरात जायची वाट अडवून रखवालदारासारखा उभा राहिला. दोघांचाही चेहरा आंबट का काय म्हणतात तसा झाला. बापरे याच्याबरोबर राहायला लागणार का काय? या विचाराने दोघांच्याही चेहऱयावर तुडुंब निराशा आली. ‘‘कौन हो आप?’’ माझे नाव सांगितल्यावर ‘‘हा भाई ने बोला था’’ असे काहीतरी बोलला आणि निर्विकार चेहऱयाने आत निघून गेला. मी बराच वेळ इकडे तिकडे बघत नुसताच बसून राहिलो. ‘‘मेरा नाम सोनू. दिल्ली से हूं. चाय पियोगे?’’ आमचा संवाद सुरू झाला. ‘‘नही मैं कॉफी पीता हूं.’’ यावर ‘‘ठिक है तो खुद बनालो’’ अशी उर्मट रिऍक्शन देऊन त्याच्या त्याच्या कामाला लागला. मला पुढचे भविष्य दिसायला लागले. हा असाच दादागिरी करत राहिला तर… अरे बैला मग कशाला उगाच चहाचे विचारले… वगैरे विचार करत माझी मी कॉफी बनवली आणि कप घेऊन गॅलरीत गेलो. तोसुद्धा त्याचा चहाचा कप घेऊन मागून आला आणि बाजूला उभा राहिला, पण दोघेही गप्प. इतका बिनडोक, निर्विकार व्यक्तिमत्त्वाचा माणूस जर अभिनय क्षेत्रात आला तर डोक फोडून घेण्याशिवाय काही गत्यंतरच नाही. म्हणजे सहकलाकारांना. असा विचार माझ्या डोक्यात आला. थोडय़ा वेळाने मीच बोलायला सुरुवात केली. ‘‘मुंबई मे कैसे आए? क्या काम करते हो?’’
‘‘ऍक्टर बनने आया हूं.’’ यावर ‘‘क्या?’’ मी एवढय़ा मोठय़ाने ओरडलो की, अवघ्या सिनेसृष्टीला जाग आली असती. ही गोष्ट आहे दोन हजार सालातली. मी नुकताच मुंबईत आलो होतो आणि एका संदीप नावाच्या मित्राबरोबर रूम शेअर करणार होतो. सोनू संदीपचा मित्र, त्यामुळे तोसुद्धा रूममेट असणार होता आणि असा त्यादिवशी रूमधला आमचा प्रवास सुरू झाला. कपडे धुण्यापासून ते कॉफी बनवण्यापर्यंत सगळे मी स्वतःच करत होतो. हे शारीरिक श्रम एक वेळ सुसह्य झाले असते, पण हा सोनू नावाचा दगड रोज मला अभिनयाचे धडे देत होता. सिनेसृष्टीविषयी ज्ञान देत होता. सहनशीलता हा माझ्या स्ट्रगलचा केंद्रबिंदू झाला होता. एवढे सगळे करून कामासाठी करावा लागणारा घराबाहेरचा स्ट्रगल पण उरावर होताच. सगळा स्ट्रगल मी करत होतो, पण हाताने कपडे धुवायचा स्ट्रगल नकोसा व्हायचा. त्या कपडय़ाच्या ढिगाऱयात मला सोनूचा चेहरा दिसायचा आणि एक दिवस चमत्कार झाला.
त्याचे असे झाले की, मी त्या काळात बऱयाचदा पृथ्वी थिएटरवर जात असे. बरेच प्रतिथयश कलाकार तिथल्या वातावरणात रमत असत. हा सोनू दगडसुद्धा तिकडे यायचा. एक दिवस नसिरुद्दीन शहा आणि पंडित सत्यदेव दुबेंशी काहीतरी चर्चा करताना त्याने मला पाहिले. थोडय़ाच वेळात संजना कपूर पण तिथे आली. हे सर्व तो लांबून बघत होता. ते माझ्या लक्षात आले आणि मी त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. माझे काम आटपून रात्री-अपरात्री कधीतरी मी घरी गेलो आणि पाहतो तर काय माझे कपडे धुऊन वाळत टाकले होते. दुसऱया दिवशी मी उठायच्या आधी कॉफी आणि ब्रेकफास्ट माझ्यासाठी तयार होता. जेवणही आयतेच मिळाले. मी फार मोठा कुणीतरी असामी असणार असा सोनूचा गैरसमज झाला होता. मीसुद्धा गैरसमज दूर करायच्या फंदात पडलो नाही. मी जितका काळ तिथे राहिलो तितके दिवस सोनू माझी सर्व कामे करत होता. महत्त्वाचे म्हणजे माझे कपडे धुऊन इस्त्राr करून ठेवत होता. अक्षरशः माझा शब्द झेलायला तो तत्पर असे, पण मी एकदासुद्धा त्याला थँक्यू म्हटले नाही. याउलट, म्हणजे मी कधी त्याला बोललो नाही, पण त्याने माझा फूट मसाज करावा असेही मला एक-दोन वेळा वाटून गेले आहे. मला वाटायचे की, जे माझ्यासाठी करतो आहे तो त्याच्या स्ट्रगलचा एक भागच आहे. खरं म्हणजे माझा आळशीपणा कुरवाळण्यासाठी मीच माझ्या मनाची तशी समजून करून घेतली होती. काही दिवसांनी मी दुसरीकडे राहायला गेलो (तिकडे वॉशिंग मशीनची सोय होती). मी त्यानंतर परत कधीही त्याला भेटलो नाही. पण परवा अचानक आमच्या घरातलं वॉशिंग मशीन बिघडले व सोनूची मला प्रकर्षाने आठवण झाली आणि हेही आठवले की, मी त्याचे कधीही आभार मानले नाहीत. पण आता मानतो मित्रा. थँक्स डियर सोनू!




























































