इतिहासाची सोनेरी वाट…

>> रोहिणी निनावे

दिग्दर्शक कार्तिक केंढे. वेगळं करण्याची ओढ कलाक्षेत्रात घेऊन आली आणि इतिहासाच्या प्रकाशात वाट उजळली.

कार्तिक केंढे हे नाव कैकदा तुम्ही पडद्यावर बघितले असेल. प्रसिद्धीपासून दूर राहणाऱया कार्तिकने गेली अनेक वर्षे सातत्याने आणि मेहनतीने काम केले आहे. मी आणि कार्तिकने काही मालिकांमध्ये सोबत कामही केले आहे. पण आमचे कधी फारसे बोलणे झाले नाही ते या मुलाखतीच्या निमित्ताने होणार होते. फिल्म सिटीमध्ये त्याच्या प्रसिद्ध ऐतिहासिक मालिकेचे चित्रीकरण चालू होते. काही कारणाने सहाय्यक दिग्दर्शकही सुट्टीवर असल्याने आम्हाला आमची मुलाखत लंच टाइममध्ये संपवायची होती.

मी ठरलेल्या वेळेवर तिथे पोहोचले आणि मी बोलायला सुरुवात केली.

कार्तिक म्हणाला, मी मुळात पुण्याचा. इतर मुलांसारखेच शिकायचे आणि नोकरी करायची असे मी आई-वडिलांच्या इच्छेनुसार ठरवले होते आणि इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. माझे वडील रिक्षा चालवत होते, त्यामुळे मी शिक्षण पूर्ण करावे याविषयी त्यांचा आग्रह होता. इंजिनीअरिंग कॉलेज असल्याने कॉलेजची वेळ आाणि सुट्टय़ांचा काळ इतरांपेक्षा वेगळा असायचा. त्यामुळे मला जेव्हा वेळ असायचा तेव्हा मित्रांना नसायचा. त्यामुळे रिकामा वेळ जाता जायचा नाही. मला वाचण्याची पूर्वीपासून आवड असल्याने मी वाचत बसायचो.

सकाळी साडेसात ते दुपारी चारपर्यंत आमचे कॉलेज असायचे. यादरम्यान शाळेतला एक मित्र आनंद जोशी मला भेटला. त्याच्या एकांकिकेची तालीम चालू होती. तो म्हणाला, टाइमपास म्हणून येऊन बसत जा. आणि मी तालमीला जाऊन बसायला लागलो. हळूहळू मग मी रोजच जायला लागलो. मला ते सगळं वातावरण आवडायला लागले.

कॉलेजच्या दरम्यान माझी ओळख अजय सरपोतदार यांच्याशी झाली. ते तेव्हाच्या ‘ई टीव्ही’मध्ये होते. त्यांनी मलाही तिथे रुजू करून घेतले प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. मी विचारले, प्रोडक्शन मॅनेजरचे हे जे काही काम तू केलेस त्याचा पुढे काही उपयोग झाला का? कार्तिक म्हणाला, अर्थात, यादम्यानच प्रोडक्शन कसे सांभाळायचे हे मला कळले.

मी विचारले, मग मुंबईमध्ये कसे येणे झाले? कार्तिक म्हणाला, पुणे महानगरपालिकेतर्फे शनिवारवाडा महोत्सव आयोजित केला होता. हा कार्यक्रम अतिशय भव्य-दिव्य होता. त्यात घोडे, हत्ती होते, असंख्य कलाकार होते, त्याची जबाबदारी माझ्यावर होती… पण हा कार्यक्रम खूप छान तऱहेने संपन्न झाला… आणि माझं हे काम बघून तो कार्यक्रम बघायला आलेले आदेश बांदेकर खूश झाले आणि म्हणाले, या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर इथे राहून काही होणार नाही… तुला मुंबईमध्ये यावे लागेल. मी म्हटले, काही काम असेल तर सांगा, मी येईन. काही दिवसांनी अचानक बांदेकरांचा फोन आला की, उद्याच निघून ये.

माझ्या एकूण कारकीर्दीत अजय सरपोतदार आणि आदेश बांदेकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मुंबईमध्ये आल्यावर मी हाऊसफुल हा नाटकांवर आधारित कार्यक्रम जवळजवळ वर्षभर केला. मी म्हटले, मालिकांसाठी दिग्दर्शन करण्याची संधी कधी मिळाली? कार्तिक म्हणाला, इथेही आदेश बांदेकर यांनीच मला संधी दिली राकेश सारंग यांच्या अधुरी एक कहाणी या सीरिअलमध्ये. मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो. यादरम्यान मी हे तंत्र शिकलो आणि अवघ्या सहा-सात महिन्यांमध्ये मीही मालिका स्वतंत्ररीत्या दिग्दर्शित करायला लागलो. मी विचारले, तुझ्या कारकीर्दीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऐतिहासिक मालिका… ‘राजा शिवछत्रपती’ याविषयी सांग. कार्तिक म्हणाला, खरंच माझ्या कारकीर्दीला मिळालेले ते सोनेरी वळण आहे. यासाठी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. शिवाय नशिबानेच दृष्ट लागण्यासारखी ड्रीम टीम माझ्याबरोबर होती. कलाकारांसकट सगळय़ा तंत्रज्ञांची टीम जीव ओतून काम करत होती. एक इतिहास तेव्हा महाराजांच्या काळात घडला… आणि हा इतिहास पुन्हा रचताना मालिकांच्या क्षेत्रात एक इतिहास रचला गेला होता. महाराजांवर मालिका म्हटल्यावर सगळय़ांना तसेही स्फुरण चढलेले असायचेच. अक्षरशः फिल्मसारखे काम चालू होते. इतक्या सगळय़ा निष्णात लोकांच्या संगतीत राहून मी खूप काही शिकलो. माझ्या कामावर नवीन अमूल्य असे संस्कार झाले.

मी विचारले, ऐतिहासिक मालिका दिग्दर्शित करण्यासाठी वेगळी अशी तयारी करावी लागते का? कार्तिक म्हणाला, हो, त्यासाठी नीट अभ्यास करावा लागतो. वाचावे लागते. वाचनाची आवड तर मला होतीच. ऐतिहासिक पुस्तकेही मी वाचत होतो. पण मालिका करण्याच्या दृष्टीने पुन्हा वाचायला लागलो. तो काळ उभा करायचा. आधुनिकतेचा इतकासाही स्पर्श फ्रेममध्ये दिसायला नको. पेहरावात, रंगभूषेमध्ये, नेपथ्यामध्ये दिसायला नको. मी म्हटले, हे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे.

तो म्हणाला, हो, मी काही इतिहासकारांशीही चर्चा केली. शिवाय सेटल ही काही दिग्गज लोकांनी येऊन भेट दिली. मी म्हटले, पण ऐतिहासिक मालिका करायची म्हणजे खूप गोष्टींचे भानही ठेवावे लागत असेल ना? कार्तिक म्हणाला, हो, कारण एपिसोड तयार करायचा, तो वेळेत पाठवायचा, परफेक्शन पाळायचं, ठरावीक मिनिटांचं फुटेज द्यायचं हे करताना त्यातली क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवायची, सेटवरचे वातावरण उत्फुल्ल ठेवायचे, कुठल्याही तांत्रिक अडचणींना तोंड द्यायची तयारी ठेवायची यासाठी खूप प्लॅनिंग करावे लागते. जवळजवळ महिनाभराची गोष्ट आधीच ठरवून, एपिसोड्स रेडी ठेवावे लागतात. पुढे काय करायचे आहे, याचा विचार करून ठेवावा लागतो. डीओपीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. दिग्दर्शकाचा वेग आणि डीओपीचा वेग जुळला तर काहीच कठीण नाही. फुटेजच्या बाबतीतही दोन चाके आहेत, बरोबरीने चालणारी. आम्ही महिन्यातले तीसही दिवस काम करत असतो. त्यामुळे उत्साह टिकवून ठेवावा लागतो. प्रताप गंगावणे यांच्यासारखा अभ्यासू, अनुभवी लेखक आम्हाला लाभला हे आम्ही आमचे भाग्य समजतो. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे महाराजांवर केलेल्या या मालिकेनंतर माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटायला लागला आणि ते स्वतः मला भेटायला आले. मला खूप बरे वाटले. कारण आई-वडिलांचे मन दुखवून या इंडस्ट्रीमध्ये आलो याची खंत मला सतत होती. एवढेच नाही तर नितीन देसाईंनी माझ्या आईला एक नितांत वसमरणीय आनंदाचा क्षण दिला.

नितीनजींची पुढची हिंदी मालिका ‘चित्तोड की रानी… पद्मिनी का जोहर’ या मालिकेचा मुहूर्त आईच्या हस्ते झाला. मुलाने घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता याची जाणीव त्यांना झाली. तसाच आनंद मोठा भाऊ, वहिनी आणि बहिणीलाही झाला.

मी म्हटले, या प्रवासात घडलेला काही गंमतशीर किस्सा सांगू शकशील का? तेव्हा कार्तिक म्हणाला, प्रवासाचाच किस्सा आहे. एक वेळ अशीही आली होती की, मी ठरवले असे की, बस झाले आता गाशा गुंडाळायचा आणि आई-बाबांबरोबर राहायला जायचे. म्हणून मी माझे सगळे पैसे, सामान वगैरे घेऊन पुण्याला निघालो होतो. रस्त्यात मला एक सहप्रवासी भेटला. मी भाबडेपणाने त्याला सगळे सांगितले. त्याने मला फ्रुटी प्यायला दिली. बस्स, ती फ्रुटी प्यायल्यावर मी बेशुद्ध झालो आणि तो माणूस माझे पैसे, माझं सामान घेऊन पळून गेला. दोन दिवसांनी मला शुद्ध आली तेव्हा कफल्लक झालो होतो. त्यामुळे पुण्याला जायचा विचार मला रद्द करावा लागला. बहुधा जे होते ते चांगल्यासाठीच. मी मुंबईतच राहावे अशी देवाची इच्छा असावी.
मी म्हटले, दिग्दर्शन क्षेत्रात येऊ पाहणाऱया नवीन दिग्दर्शकांना तुला काय सांगावेसे वाटते? कार्तिक म्हणाला, यासाठी तंत्र शिकण्याची खूप गरज आहे. किमान आठ ते दहा वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्याशिवाय तुम्ही त्यात मुरणार नाही. वेगवेगळय़ा विषयांवरचे वाचन करणे, अनेक इतर देशविदेशीचे कार्यक्रम बघणे, पेपर वाचणे, बातम्या बघणे, जगात आपल्या आसपास काय चालू आहे याची माहिती असणे, या क्षेत्रात दिवसागणिक होणारे बदल टिपणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कामावर निस्सीम प्रेम आणि निष्ठा असायला हवी. मेहनतीची तयारी हवी. एव्हाना सहाय्यक दिगदर्शक तीनदा घिरटय़ा घालून गेला होता. सर शॉट तयार आहे… मग मी कार्तिकचा निरोप घेतला.

– rohinininawe@gmail.com