‘सरस्वती’चा गुरुप्रसाद…! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक व अभिनेते ज्ञानेश पेंढारकर सांगत आहेत, त्यांना लाभलेल्या अपूर्व सहवासाविषयी…

साधारण 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी सकाळी ऑफिसला जायला निघतानाच आमचा लॅण्डलाइन फोन वाजला. समोरून त्या बाई म्हणाल्या, ‘‘मी किशोरी बोलतेय.’’ मी पटकन विचारले, ‘‘कोण किशोरी?’’ हे ऐकताच समोरून धाडकन फोन ठेवला गेला. मला काही कळेना. माझी पत्नी नीलाक्षीने, ‘‘काय झाले,’’ विचारल्यावर मी तिला घडलेला प्रकार सांगितला. यावर नीलाक्षी म्हणाली, ‘‘किशोरी अमोणकर तर नसतील ना?’’ वास्तविक, किशोरीताईंचा आणि माझा काही परिचय नव्हता. त्या कशाला मला फोन करतील, असे मला वाटले.

घराबाहेर पाऊल टाकतानाच पुन्हा एकदा फोन वाजला. दाजी पणशीकर म्हणजे प्रभाकरपंत पणशीकरांचे बंधू, यांचा तो फोन होता. ते मला म्हणाले, ‘‘तू स्वतःला काय समजतोस? अरे, किशोरीताईंनी तुला फोन केला होता, तर तू त्यांनाच विचारतोस की, कोण किशोरी म्हणून?’’ मी दाजींना म्हटले, ‘‘अहो, मला स्वप्नातसुद्धा कधी वाटले नाही की, किशोरीताई मला कधी फोन करतील म्हणून.’’ त्यावर दाजी म्हणाले, ‘‘मी तुला त्यांचा फोन नंबर देतो. त्यांना फोन कर.’’ त्यांच्याकडून नंबर घेऊन मी लगेच किशोरीताईंना फोन केला आणि प्रथम त्यांची क्षमा मागितली. मी त्यांना म्हटले, ‘‘मी घाईत होतो आणि मला कळले नाही की, फोन तुमचा आहे म्हणून.’’ त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘आता तरी ओळखलेस ना? तर आता अकरा वाजेपर्यंत ऑर्गन घेऊन माझ्या घरी ये.’’

माझा ऑर्गन माझ्या मित्राकडे होता हे त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू तिथून घेऊन ये

ऑर्गन.’’ मी त्यांना विचारले, ‘‘ऑर्गन कोण वाजवणार?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘तुझा ऑर्गन आहे तर तूच वाजवणार.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘ऑर्गन सोडून मला बरीच वर्षे झाली आहेत. हात आणि पाठ दुखते म्हणून मी ऑर्गन वाजवणे बंद केले आहे,’’ पण त्यावर त्यांनी मला आदेशच दिला की, ऑर्गन घेऊन अकरा वाजेपर्यंत माझ्या घरी पोहोच. यावर आमचे अण्णा (भालचंद्र पेंढारकर) आणि नीलाक्षीला पुढे काय करायचे ते मी विचारले. ते दोघेही म्हणाले, ‘‘ताईंनी तुला बोलावले आहे, तर जाऊन ये.’’ ऑर्गन वाजवायची माझी सवय पार मोडली होती आणि किशोरीताईं बरोबर ऑर्गन वाजवायचा म्हटल्यावर माझ्या पोटात गोळाच आला होता.

शेवटी मी ऑर्गन घेऊन किशोरीताईंच्या घरी पोहोचलो. किशोरीताई मीरेचे भजन गात होत्या. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘कार्यक्रम कधी आहे?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अजून 25 दिवस तरी आहेत.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मी वाजवीन, पण एका अटीवर. मी रोज तुमच्याकडे रिहर्सलला येईन आणि तुम्ही जे गाता ते रेकॉर्ड करीन.’’ हे ऐकताच उपस्थितांच्या भुवया वर गेल्या. ताईंना हा असे कसे काय विचारू शकतो, असा प्रश्न त्यांच्या चेहऱयावर उमटला. ताईंनी मला विचारले, ‘‘दररोज तालीम कशासाठी हवी?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला साथ करायची मला सवय होईल, मी कुठे चुकतोय हे तुम्ही मला सांगू शकाल आणि रेकार्ंडग अशासाठी हवे आहे की, तुम्ही जे सांगाल ते माझ्याकडे राहील व त्याचा मला उपयोग होईल. आपण एकजीव होऊ.’’ त्यांना माझा ‘एकजीव’ हा शब्द खूप आवडला आणि त्यांनी मला मुभा दिली. त्यानंतर रोज ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी मी त्यांच्या घरी जायचो. रोज तासभर तालीम व्हायची.

एकदा मी त्यांना म्हटले की, ‘‘मला तुमचा ‘मारवा’ ऐकायचा आहे.’’ त्यांच्या घरातल्या वनिता या केअरटेकरने हे ऐकताच कपाळावर हात मारला. आता याला ताईंचे काहीतरी ऐकून घ्यावे लागणार, असा तिचा एकूणच अविर्भाव होता, परंतु ताईंनी मला ‘सा’ लावायला सांगितले आणि 15 मिनिटे ताईंनी मला फक्त ‘मारवा’ ऐकवला. ना तबला, ना इतर काही, फक्त सूर होते. तन-मन एकत्र करून त्या ज्या पद्धतीने गात होत्या ते पाहून मला तर वाटले की, माझ्या आयुष्यातला हा ‘गुरुप्रसाद’च मला मिळतोय.

मी एकदा त्यांना रियाजाबद्दल विचारले तर त्या म्हणाल्या, ‘‘तू माझ्याकडे शिकायलाच ये.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘घरी खूप अडचण आहे, आई खूप आजारी आहे, वडिलांची तब्येतही ठीक नसते आणि मला ऑफिसही असते.’’ हे ऐकून त्या म्हणाल्या, ‘‘17-18 वर्षे माझे पतीसुद्धा आजारी होते ते सर्व सांभाळून मी गाणे करत राहिले.’’ माझे दुर्भाग्य असे की, गंगेच्या काठावर मी फिरत होतो, पण गंगेच्या पाण्याला मला स्पर्श करता येत नव्हता. साक्षात सरस्वती तिच्यासमोर बसून तिचे गाणे मला प्रत्यक्षात ऐकायला मिळाले, तिच्याकडून बरेच शिकायलाही मिळाले. ताईंनी मला एकदाच नाही, तर दोन वेळा बोलावले. माझ्या आयुष्यातली ही फार मोठी घटना होती. ताईंकडेच ज्ञानेशचा ‘ज्ञानोबा’ झाला. कारण त्या मला ‘ज्ञानोबा’ म्हणून हाक मारायच्या.

किशोरीताईंची पट्टशिष्या नंदिनी बेडेकर मला एकदा म्हणाली, ‘‘तुझी कुंडली कुणालातरी दाखवून घे, खूप उच्च ग्रह असणार. ताई तुझ्याशी ज्या पद्धतीने वागल्या आहेत, तसा अनुभव कुणालाच आलेला नाही. तुझे भाग्य थोर आहे.’’ मला किशोरीताईंचा सहवास लाभला. त्यांच्याकडून गाण्यासह इतरही बऱयाच गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यवस्थितपणा, माधुर्य, कलात्मक रसदृष्टी हे सर्वकाही मी त्यांच्याकडून शिकलो.

– शब्दांकन – राज चिंचणकर