केंद्रे सरांच्या तालमीतून…

181

>> मिलिंद शिंदे

प्रा. वामन केंद्रे सर्जनशील दिग्दर्शक… तर्कसंगत विचारवंत. नाटक हा आत्मा. मराठी रंगभूमी ते एनएसडीचे संचालक… मोठा आवाका…

मुळात हाडाच्या कार्यकर्त्याच्या मुशीतून आणि अंतःप्रेरणेतून घडलेले मनस्वी कलावंत वामन केंद्रेसर…
‘भूपेश गुप्ता भवनला ये.’
या एका वाक्यानं आमच्यातल्या ऋणानुबंधाला सुरुवात झाली. त्याची वीण आजतागायत घट्ट आहे. घट्ट होत गेली.
मी गेलो भूपेश गुप्ता भवनला. कसाबसा शोधत. कारण त्यांना सविस्तर पत्ता कसा विचारणार? ते तेव्हाही ‘वामन केंद्रे’ होते, आताही.
गाणं गाता येतं का…?
वामनसरांनी त्यांच्या जरबी आवाजात विचारलं आणि ऐकायला सरांसह ज्येष्ठ संगीतकार अनंत अमेंबल. म्हणजे हो म्हणावं तरी अडचण, नाही म्हणावं तरी तुमच्यातल्या एनएसडी शिकलेल्या कलावंताची अडचण.
मी कसंबसं गाणं गायलो. सरांना त्यातलं काय हवं नको ते त्यांना समजलं…
‘उद्यापासून तालमीला ये’ साक्षात वामन केंद्रेसर मला म्हणत होते.
‘सर माझं एफटीआय (FTI) मधलं सामान मला घरी टाकून यावं लागेल. थोडा वेळ लागेल. मी कसाबसा त्यांच्यासमोर धीर एकवटत म्हणालो.
दोन दिवसांत जर परत आला नाहीस तर मी तुला नगरहून उचलून आणीन. एखाद्या प्रतिथयश दिग्दर्शकांनी तुम्हाला असं सांगितल्यावर कुणालाही आकाश ठेंगणंच राहील. तेच माझं झालं.
माझी समस्या मुंबईत राहण्याची होती. ती माझे मित्र राहुल रानडे यांनी सोडवली.
वामन केंद्रेसर यांची तालमीची प्रोसेस म्हणजे जणू कार्यशाळाच. हे मी नव्यानं काही सांगत नाही. ज्यांनी ज्यांनी सरांसोबत काम केलंय त्या सगळय़ांना त्याचा अनुभव आहे. त्यांच्या तालमीतून आपण श्रीमंत झाल्याचं अनेक कलावंतांनी अनुभवलंय.
त्यांच्या नाटय़विषयक भूमिकांबद्दल आग्रही असल्याबद्दलची अनुभूती त्यांच्यासोबत काम करणाऱया जवळपास प्रत्येक कलावंताने घेतलेली आहेच. वैयक्तिक मी त्यांच्या तालमीत, त्यांच्या नाटकांतून मला काम करण्याची संधी मिळाली ते अद्भुत होते.
अमृता सुभाषमुळं हे सगळं जुळून आलं आणि तो बंध वृद्धिंगत होत गेला तो आजतागायत आहे.
वामन केंद्रेसर म्हणजे हाडाचे मास्तर. त्यांच्या नाटकांतून काम करणं म्हणजे ती भूमिका तुमच्या मनपटलावर कायमची कोरली जाणं. ही त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची खात्रीच. मी सरांच्या तालमीत रुजू झालो. तालमी सुरू होत्या आणि अगदी अखेरच्या टप्प्यात मिळणाऱया मानधनाविषयी चर्चा… निर्माते भेटले. त्यांनी मला एक आकडा सांगितला. मी अगदीच नाखूष. नाराजी व्यक्त केल्यावर जमेल असं वाटलं नाही. मग बांधाबांध करावी आणि नगरला परत जावं. हे मी सरांना सांगितलं की, मेहनताना अगदीच तुटपुंजा आहे. मला वाटलं की, सर म्हणतील ‘कर ना मग’. पण सर म्हणाले, तुझ्या डिग्रीचा सन्मान मी नाही करायचा तर कुणी? (सर आणि मी एकाच शाळेचे विद्यार्थी. फक्त साधारण 20 वर्षांची तफावत असलेले NSD)
मला समाधानकारक मानधन (नाइट) मिळवून देण्याची तजवीज सरांनी केली. मी आजही त्यांचा खूप आभारी आहे, राहीन.
‘ती फुलराणी’नंतर सरांसोबत ‘झुलवा’ करण्याचा माइलस्टोन अनुभव घेतला. हा अनुभव तर केवळ अद्वितीय. 20-22 वर्षांपूर्वीचं नाटक पुन्हा करताना त्यातली गाजलेली भूमिका करणे म्हणजे अशक्यच. पण ते सगळं केवळ सरांच्या तालमीत शक्य झालं.
व्यावसायिक ओरिएंटेशन असलेल्या जगामध्ये नाटक संपलं की संबंध संपतात; पण सरांचं आणि माझं असं काही झालं नाही. तो बंध आजतागायत टिकून आहे. अर्थात श्रेय सरांच्या सोशिकतेचं. स्वतःच्या मतांशी ठाम असणारा, आग्रही असणारा माणूस केवळ आपल्या नीतिधैर्यावर आणि कलात्मकतेच्या शिदोरीवर कुठपर्यंत जाऊन पोहचतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणे वामनसर… त्यांच्यावरच्या टीकांना आपल्या कामातून उत्तर देणारे सर म्हणजे विरळाच.
पस्तीस उंबऱयांचं गाव. तिथला एक मुलगा कलावंत होण्याचं स्वप्न पाहतो आणि तो ज्या शाळेत शिकला त्याचं संस्थेचे (National School of Drama, Delhi) ते संचालक होतात. जगप्रसिद्ध ऑलिम्पिक (थिएटर) घडवून आणतात आणि ‘पद्मश्री’लाही गवसणी घालतात. वामनसर, तुमच्या प्रवासाचा आलेख पाहून हेवा तर वाटेलच, पण अनेक ग्रामीण भागातील रंगकर्मींना ‘हो सकता है’ची ऊर्मीही निर्माण केलीत ही किती मोठी प्रेरणा तुम्ही त्या सगळय़ा खेडय़ापाडय़ातील नवागतांना दिलीत.
तुम्ही साधनेतून कला साध्य केलीत ती मुंबईतून दिल्लीकडे तर गेलीच, पण ती स्वतःच्या अतिशय दुर्गम भागात आणली, जिथं अजूनही एस.टी. जात नाही तिथं तुम्ही आयोजित केलेला भारुड महोत्सव (वडिलांच्या स्मृतीसाठी) लाजवाबच. नाव झाल्यावर किती कलावंतांना आपल्या छोटय़ा खेडेगावाची आठवण येते? तुम्हाला सर सर्वसमावेशकतेची देणगीच आहे. म्हणून तर तुम्ही अनोखे आहात..
सरांच्या आठवणीत आहे की नाही; पण कुणीतरी सरांना विचारलं की, तुम्ही पुन्हा 20 वर्षांनी ‘झुलवा’ का करताय पुनः पुन्हा.
सरांचं उत्तर अजूनही माझ्या मनःपटलावर कोरलेलं आहे. ते उत्तर आहे – ‘झुलवा बंद होत नाहीत तोवर’ म्हणूनच तर तुम्ही पद्मश्री आहात…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या