माझा गणपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

बाप्पाचे आगमन प्रत्येकाच्याच घरी होते. आनंदमयी, मंगलमयी वातावरणात. आपले खेळाडू, गायक, मूर्तिकार सारेच या क्षणांचा आनंद मनमुराद घेतात.

सणाचा आनंद घ्या…

madhurika-patkar-1
आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. यंदा गणपतीचे दुसरे वर्ष आहे. घरात बाप्पा असल्यावर एक वेगळाच उत्साह असतो. सगळे कुटुंब एकत्र आलेले असते. मला मोदक बनवता येत नाहीत, पण ते त्यांच्यासोबत बनवण्याचा प्रयत्न करते. गणेशोत्सव का साजरा करतो हे प्रत्येकाला कळायला हवे. हा पारंपरिक सण पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल याकडेही लक्ष द्यायला हवे. असे मला वाटते. आमच्याकडे नैवेद्यात उकडीचे मोदक, तळणीचे मोदक हमखास असतात. गणपती घरात असल्यामुळे वर्षभर न भेटणारे नातेवाईक-मित्रमंडळी त्यानिमित्ताने घरी येतात-भेटतात. घरात सकारात्मक वातावरण असते. बाप्पाच्या आरतीच्या वेळेला अगदी एकरूप होऊन जाते. यंदा गणपतीत मी नसणार आहे. गणपतीच्या दुसऱया दिवशी चीनला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. तिथे आमची एशियन चॅम्पियनशिप आहे. सरावही महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्या तयारी सुरू आहे. मला असं वाटतंय डोळे बंद करून सण साजरे करू नका. हा उत्सव आहे , त्याचा आनंद घ्या. देवाशी एकरूप व्हा. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या.
– मधुरिका पाटकर, खेळाडू

सणाचे पावित्र्य जपूया

vishal-shinde-1

माझ्या काकांकडे करीरोडला गणपती असतो. गणपतीची मूर्ती मीच करतो. तेवढाच माझा सहभाग असतो. मूर्तिकार असल्यामुळे मला तिथे फारसे लक्ष देता येत नाही. सजावटीसाठी मला वेळ देता येत नाही. आमचा अकरा दिवसांचा बाप्पा असतो. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा मी करीरोडला जाऊन येऊन असतो. गणपतीच्या दिवसात मूर्तींची कामे झालेली असतात, थोडा निवांतपणा असतो. त्यामुळे तिथे गेल्यावर कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि इतक्या दिवसाचा क्षीण नाहीसा होतो. आमचं मोठं कुटुंब आहे, त्यामुळे त्या दिवसात वेळ कसा जातो ते कळतच नाही. आमची गेली 55 वर्षे शाडूच्या मातीचीच मूर्ती असते. माझा चुलत भाऊ पोलीस आहे, तो सजावटीचे पाहतो, त्यालाही कलेची आवड असल्याने सजावटीचे सगळे काम तो पाहतो. वेळ मिळेल तसा तो करतो. शक्यतो पर्यावरणपूरक सजावटीचा त्याचा प्रयत्न असतो. मी स्वतः एक आर्टिस्ट असल्यामुळे पारंपरिकतेला आधुनिक जोड द्यायला आवडते. माझ्या कलेच्या माध्यमातून मी गणेशाच्या बालमूर्ती साकारून बाप्पाला आणखी भक्तांच्या जवळ आणले, पण त्याच्या पावित्र्याला कुठेही धक्का दिला नाहीय. लोकांना ती रूपं आवडली. मी विडंबन न करता त्याचे पावित्र्य जोपासले आहे. आपण सगळे सुजाण आहोत. चांगले-वाईट समजते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा. ती सध्याची गरज आहे. ते जर केले तर स्वच्छ हिंदुस्थान आपोआपच होईल, त्याची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी.
– विशाल शिंदे, मूर्तिकार

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा!

kartiki-gaikwad-1
अकरा दिवसांचा बाप्पा आमच्या घरी असतो. त्याच्या आगमनाच्या चार-पाच दिवसांपासून सगळी भावंडे मिळून सजावटीचे काम करतो. आम्ही सगळेच गात असल्यामुळे बाबा आम्हाला गणपतीबाप्पासमोर गाणं शिकवतात. गणपतीवर रचलेल्या बंदिशी गाताना मनाला खूप शांतता आणि आनंद मिळतो. माझा सहभाग म्हणजे बाप्पाच्या सजावटीत वेगळेपण काय असायला हवे हे मीच बघते, पण या सगळ्यात रियाजाकडे दुर्लक्ष अजिबात होत नाही. बाप्पासोबत रियाज करण्याचा वेगळाच आनंद असतो. तेव्हा असे वाटते बाप्पा आपला रियाज ऐकत आहे. माझी आईही भक्तिभावाने बाप्पाची सेवा करत असते. गणेशोत्सवात नैवेद्यामध्ये आमच्याकडे नावीन्यता असते. मूर्ती शाडूची असते. आळंदीत बाप्पाची मिरवणूक निघते तेव्हा टाळ-मृदंगाच्या गजरात काढली जाते. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली, बऱयाच संकटांना आपल्याला सामोरे जावे लागले, या सगळ्याची जाणीव आपणही ठेवूया, मात्र यावेळी पाहायला मिळालेला अख्ख्या महाराष्ट्राचा एकोपा कौतुकास्पद आहे.
– कार्तिकी गायकवाड, गायिका.

– [email protected]