
आजवर उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होत आला आहे. मात्र, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर येऊन शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांचा सन्मान करण्याची घटना प्रथमच घडली आहे. या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळेच उसाचे एकरी 126 टन उत्पादन घेणे शक्य झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पाडेगाव येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, डॉ. सूरज नलावडे, डॉ. सुरेश उबाळे, तळेकर व इतर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा पाडेगाव येथे येऊन सन्मान केला.
प्रगतशिल शेतकरी विकास चव्हाण म्हणाले, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळेच जास्तीत जास्त ऊस उत्पादनाचे सातत्य टिकवून ठेवता आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सुरू उसाचे एकरी 126 टन उत्पादन व खोडवा पिकाचे 110 टन उत्पादन मिळत असल्याची माहिती विकास चव्हाण यांनी दिली.
ऊस विशेषज्ञ कार्यरत असेपर्यंत व निवृत्तीनंतरही इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेतकरी विकास चव्हाण, गंगाधर पाखरे, राहुल सणस, विकास वाळुंज, सोमनाथ हुलगे, उत्तम जाधव, बाबाजी बांगर, सौरभ कोकीळ, राजेंद्र यादव, सोमनाथ पवार, माउली सुरवसे, तुकाराम धायतोंडे, सोमनाथ पवार अशा 13 शेतकऱ्यांनी मिळून ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांना लॅपटॉप भेट दिला. यावेळी पाडेगावचे अमरसिंह बुरुंगले, सुधीर डोंबाळे, मोरे, गोरे, देढे, चोरमले, राजेश खरात, डॉ. सुभाष घोडके उपस्थित होते.

























































