स्मृती इराणी यांच्या फॅमिली रेस्टॉरंटला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याची चौकशी करा; गोवा टीएमसीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या रेस्टॉरंटला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याबाबत स्पष्टता देण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली. गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते ट्राजानो डी’मेलो, समिल वळवइकर आणि मारियानो रॉड्रिग्स यांनी पणजीतील पक्ष कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गोवा टीएमसीचे नेते ट्राजानो डीमेलो म्हणाले, ‘रेस्टॉरंटला खाद्य परवाना मिळण्यापूर्वी मद्य परवाना कसा दिला जाऊ शकतो.’ भाजप सरकारच्या प्रशासकीय अपयशाबाबत ते म्हणाले, ‘जेव्हा भाजपच्या मंत्र्यांचा प्रश्न येतो, तेव्हा कायद्याची सर्व प्रक्रियाच संपून जाते. खरे तर न्यायव्यवस्थेला दडपण्यासाठी भाजपच न्यायव्यवस्थेचा गैरवापर करते.’

सध्याच्या अधिवेशनात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका करताना डी’मेलो म्हणाले, ‘विरोधकांनी सरकारसमोर गुडघे टेकले आहेत. ते प्रसिद्धीच्या मागे असून गोव्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीते काहीही करत नाही.’ परवाना मिळविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संशयास्पद प्रक्रियेच्या चौकशीची मागणीवर डी’मेलो यांनी जोर दिला. ‘सरकारने या प्रकरणाची स्वच्छ आणि खुली चौकशी केली पाहिजे.’

भाजप प्रशासनाच्या दुटप्पीपणावर जोर देण्यासाठी गोव्यातील टीएमसीचे नेते समिल वळवइकर म्हणाले, ‘गोव्यातील उद्योजकांना एक साधा परवाना मिळवणे कठीण जाते, तर भाजपशी संबंधित शानियासारखे ‘व्हीआयपी’ आवश्यक कागदपत्रांशिवाय ते मिळवतात.’ जुन्या गोव्यातील बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावर भाजप सरकारची उदासीनता अधोरेखित करताना वळवइकर म्हणाले, ‘बेकायदेशीर बांधकाम हे सीआरझेड नियमांचे आणि एएसआयने ठरवून दिलेल्या निकषांचे पूर्णपणे उल्लंघन करत आहे. हा मुद्दा पंचायत संचालकांकडे हस्तांतरित करूनही त्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी निश्चित मुदत दिलेली नाही.’’ गोवा तृणमूल काँग्रेसची मागणी आहे ,की प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मृत व्यक्तीला जारी केलेल्या बेकायदेशीर परवान्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.