आता ह्या काय नवीन! म्हणे मोदींना ‘अज्ञात धोका’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-london

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा कडेकोट करण्यात आली असून कोणत्याही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला सहजपणे त्यांच्याजवळ जाता येणार नाही. पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मंत्र्यांची तपासणी होऊन स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची(एसपीजी) परवानगी घ्यावी लागेल. एवढी मोठी सुरक्षा वाढविण्यामागचे कारण पंतप्रधानांना ‘अज्ञात धोका’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आपल्याच पंतप्रधानांना भेटण्यासाठी मंत्र्यांनाच एसपीजीची परवानगी घ्यावी लागण्याची कदाचित देशातील पहिलीच वेळ असेल.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कथित कट उघड झाल्याच्या दाव्यानंतर गृहमंत्रालयाने सुरक्षेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सीपीआयशी (माओवादी) कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी एकाच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्र मिळाले होते. त्यात राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या हत्येबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच पंतप्रधानांच्या पश्चिमबंगाल दौऱ्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या पाया पडण्यासाठी सुरक्षेचे सात कडे तोडून पोहचली होती. या घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राजीव जैन उपस्थित होते.

गृहमंत्रालयाच्या सूचना

  • पंतप्रधान मोदींच्या जीवाला कधी नव्हे इतका आता धोका निर्माण झाला आहे.
  • पंतप्रधानांना ‘अज्ञात धोका’ आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सर्वाधिक सुरक्षेची गरज आहे.
  • पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत क्लोज प्रोटेक्शन टीमला  माहिती दिली आहे. गरज असेल तर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांचीही तपासणी करण्यात येईल.
  • मंत्र्यांना आणि उच्चपदस्थाना सहज पंतप्रधानांना भेटता येणार नाही. ‘एसपीजी’ची परवानगी लागेल.
  • २०१९च्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी रोड शो कमी करून सभांवर अधिक भर द्यावा.