
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच सीबीआय आणि ईडीचे पथक त्यांच्या घरी धडकले; मात्र अटकेच्या भीतीने चिदंबरम बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या पथकाने चिदंबरम यांच्या घरातील नोकरांची चौकशी केली. दरम्यान, अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; पण तेथेही तत्काळ सुनावणी होणार नसल्याने चिदंबरम यांना दिलासा मिळालेला नाही.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात चिदंबरम यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चिदंबरम चौकशीला सहकार्य करीत नाहीत. त्यांची कोठडीत चौकशी होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद करीत सीबीआय आणि ईडीने चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. चिदंबरम यांचे वकील दया कृष्णन यांनी जामीन फेटाळण्याच्या आदेशाला तीन दिवसांची स्थगिती द्या अशी विनंती केली. मात्र, न्यायमूर्ती सुनील गौर यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
सुप्रीम कोर्टात तत्काळ सुनावणी नाही
हायकोर्टाने जामीन फेटाळताच चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला. चिदंबरम यांचे वकील काँग्रेस नेते, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांना न्यायालयाने तत्काळ सुनावणीस नकार दिला. आता बुधवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणीची शक्यता आहे.
काय आहे घोटाळा?
आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीर मंजुरी देण्यासाठी 2007 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम यांनी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती.शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची ‘आयएनएक्स मीडिया’ ही कंपनी आहे. चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मिडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.
पथक दारात हजर
हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ईडी आणि सीबीआय अधिकाऱयांचे पथक चिदंबरम यांच्या निवासस्थानी सायंकाळी हजर झाले. मात्र, चिदंबरम घरातून बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. सायंकाळी 5 पर्यंत चिदंबरम हायकोर्टात होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. चौकशी पथकाने चिदंबरम यांच्या घरातील नोकरांची चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. त्यावेळी चिदंबरम हजर राहतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

























































