IPL 2020 – चेन्नईकडून बंगळुरूच्या आशांना सुरुंग, प्ले ऑफची प्रतीक्षा वाढली

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची प्रतीक्षा रविवारी आणखीन वाढली. चेन्नई सुपरकिंग्सने आठ गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज विजय मिळवला आणि विराट कोहलीच्या ब्रिगेडला 14 गुणांवरच समाधान मानावे लागले. चेन्नई सुपरकिंग्सने चौथ्या विजयासह आठ गुणांची कमाई केली. महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने सलामीला येऊन 51 चेंडूंत नाबाद 65 धावांची खेळी साकारताना तीन षटकार व चार चौकार चोपून काढले. त्याचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

संघाचा विजय महत्त्वाचा – ऋतुराज गायकवाड

या लढतीत सामनावीर ठरलेल्या ऋतुराज गायकवाड याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, नाबाद राहून संघाला विजय मिळवून देता आला. त्यामुळे आनंद गगनात मावेनासा झालाय. कोरोनाची लागण झाल्यामुळे संघातील इतर खेळाडूंपेक्षा जास्त काळ क्वारंटाइन राहावे लागले. यावेळी संघ व्यवस्थापनापासून सर्वांचाच मोलाचा सपोर्ट मिळाला. गेल्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. आयपीएलच्या या मोसमात माझ्याकडून मोठी खेळी होणार हे माहीत होते.

82 धावांची भागीदारी, पण…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल (22 धावा) व अॅरोन फिंच (15 धावा) ही सलामी जोडी 46 धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व ए बी डिव्हीलीयर्स या स्टार खेळाडूंनी 82 धावांची सणसणीत भागीदारी रचली. पण दीपक चहर याने ए बी डिव्हीलीयर्सला 39 धावांवर फाफ डय़ुप्लेसिसकरवी झेलबाद करीत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर सॅम करण व दीपक चहर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कमी धावसंख्येत रोखले. विराट कोहलीने 43 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 बाद 145 धावाच करता आल्या. सॅम करणने 19 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सहज पाठलाग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिळालेल्या 146 धावांचा पाठलाग करणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने अवघे दोन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. ऋतुराज गायकवाड व फाफ डय़ुप्लेसिस यांनी 46 धावांची भागीदारी करीत आश्वासक सुरुवात करून दिली. ख्रिस मॉरीसने फाफ डय़ुप्लेसिसला 25 धावांवर बाद करीत जोडी पह्डली. त्यानंतर मराठमोळय़ा ऋतुराज गायकवाड याने अंबाती रायुडू याच्यासोबत 67 धावांची भागीदारी करीत चेन्नई सुपरकिंग्जला विजयासमीप नेले. युजवेंद्र चहल याने अंबाती रायुडूला 39 धावांवर बाद केले. अखेर महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद 19 धावा) साथीने ऋतुराज गायकवाडने (नाबाद 65 धावा) चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मालवणी तडका (चेन्नई – बंगळुरू लढत)

दसऱया दिवशी कोहलीने बॅटिंग घेतली… स्वतः बॅटिंग पण बरी केल्यान… पण 146 रन चेन्नईन अगदी सहज पार पाडले… चेन्नई संघान जाता जाता बंगळुरूला ह्यो मोठो धक्को दिलो…
बादल चौधरीच्या शब्दांत-चेन्नईवाल्यानी बंगळुरूवाल्यांका ‘आल्यातला दिल्यानी…’

आपली प्रतिक्रिया द्या