
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 200 धावा केल्या आणि दिल्लीपुढे विजयासाठी 201 धावांचे आव्हान ठेवले. मात्र दिल्लीला हे आव्हान पेलवले नाही. दिल्लीचा संघ 8 बाद 143 धावा करू शकला आणि मुंबईने 57 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली.
दिल्लीची खराब सुरुवात
मुंबईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. धावफलकावर एकही धाव नसताना दिल्लीने धवन, पृथ्वी आणि रहाणे हे 3 खेळाडू गमावले. यानंतर आलेला अय्यर 12 आणि पंत 3 धावा काढून बाद झाला.
स्टोयनिस-पटेलने सावरले
यानंतर मार्कस स्टोयनिस आणि अक्षर पटेल यांनी मधल्या षटकात दिल्लीचा डाव सावरला आणि 71 धावांची भागीदारी केली. स्टोयनिसने अर्धशतक ठोकत 65 धावा केल्या. बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. तर पटेलने 42 धावांची खेळी केली.
शानदार गोलंदाजी
मुंबईचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी शानदार गोलंदाजी केली. पहिल्याच षटकात बोल्टने पृथ्वी आणि रहाणेला बाद केले. यानंतर बुमराहने धवनच्या दांड्या गुल केल्या. बोल्टने या लढतीत 2 षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले, तर बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 4 बळी घेतले.
पर्पल कॅपवर कब्जा
दरम्यान, बुमराहने आजच्या शानदार कामगिरीच्या बळावर पर्पल कॅपवर कब्जा केला. त्याच्या नावावर 27 विकेट्सची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये एका सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला.
मुंबईची प्रथम फलंदाजी
मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. आर. अश्विन याने त्याला पायचीत केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डीकॉक यांनी डाव सावरला.
दोघांमध्ये 50 धावांची भागीदारी झाली. अश्विनने ही जोडी फोडली. डीकॉक 25 चेंडूत 40 धावा काढून बाद झाला. यानंतर आलेल्या ईशान किशन आणि सूर्यकुमारमध्ये छोटी भागीदारी झाली. मात्र अर्धशतक झाल्यावर सूर्यकुमार बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 28 चेंडूत 51 धावा केल्या.
पांड्याची फटकेबाजी
यानंतर आलेला पोलार्ड शून्य आणि कृणाल पांड्या 13 धावा काढून बाद झाले. अखेरच्या 4 षटकात हार्दिक पांड्या आणि ईशान किशन यांनी 60 धावा चोपल्या. किशनने 30 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 तर पांड्याने 14 चेंडूत 5 षटकार ठोकत नाबाद 37 धावा चोपल्या.


























































