IPL 2020 – धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम, रोहित, रैनाच्या पंक्तीत मिळवले स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा चाचपडताना दिसत आहे. एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाला 7 पैकी 5 लढतीत पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी झालेल्या लढतीतही चेन्नईला आरसीबीकडून 37 धावांनी पराभूत व्हावे लागले. चेन्नईच्या डावात धोनीने 10 धावांची छोटी खेळी केली, मात्र यादरम्यान एका खास विक्रमाची नोंद केली.

बंगळुरू विरुद्ध 170 धावांचा पाठलाग करताना धोनीने 10 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने युझवेंद्र चहलला एक षटकार ठोकला. यासह टी-20 क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 300 षटकारांची नोंद झाली. धोनीने 324 टी-20 (आयपीएल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट) लढतीत 300 षटकार ठोकले आहेत. धोनीच्या आधी अशी कामगिरी टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना आणि उप कर्णधार रोहित शर्मा याने केली आहे.

सुरेश रैना याच्या नावावर 311 षटकारांची नोंद आहे. या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा असून त्याच्या नावावर सर्वाधिक 375 षटकार आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार
दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा धोनी पहिला हिंदुस्थानी खेळाडू आहे. धोनीने 197 लढतीत 214 वेळा चेंडूला हवाई मार्गे सीमापार पोहोचवले आहे.