
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत झोकात सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर एक वेळ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर नामुष्की ओढवली असती. दिल्लीची रडतखडत प्ले ऑफ गाठली. मात्र दिल्लीला क्वालिफायर लढतीत मुंबई इंडियन्सने 57 धावांनी पराभूत केले. दिल्लीच्या या पराभवात सुरुवातीच्या फलंदाजाचा मोठा वाटा राहिला.
मुंबईने दिलेल्या 201 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. यात एक नाव सलामीवीर पृथ्वी शॉ याचेही आहे. गेल्या 6 लढतीत तो 3 वेळा भोपळाही फोडू शकलेला नाही. त्यामुळे त्याला नेतकऱ्यांनी धारेवर धरले असून ‘ज्याला आम्ही क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वारसदार समजत होतो, तो तर आफ्रिदी निघाला’, असे म्हणत त्याला ट्रोल केले जात आहे.
आयपीएल 2020 मध्ये सुरुवातीच्या लढतीत चांगली कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉ याची बॅट नंतर एकदम थंडावली. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 13 लढतीत 136.52 च्या सरासरीने फक्त 228 धावा केल्या आहे. गेल्या 8 डावात तर तो एकदाही 20 चा आकडा देखील पार करू शकलेला नाही.
गेल्या 8 डावात 19 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. यादरम्यान तो 3 वेळा शून्यावर बाद झाला. त्याच्या खराब कामगिरीमुळे मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव येत असून त्यामुळे दिल्लीची कामगिरीही खालावली. मुंबई विरुद्ध देखील पृथ्वी झटपट बाद झाल्याने नेटकऱ्यांनी त्याला निशाण्यावर घेतले. सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत.
अजून एक संधी
दिल्ली कॅपिटल्सचा संघ अजून एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही. त्यात पहिला क्वालिफायर सामना गमावलेल्या दिल्लीकडे फायनल गाठण्याची आणि चषक जिंकण्याची अजून एक संधी आहे. दिल्लीला दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळायचा आहे. हैद्राबादने एलिमीनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे.































































