
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा फिट झाला असून आता तो आयपीएलमधील उर्वरित लढतींमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करू शकणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, इशांत शर्माला दुखापत झाली होती, पण यामधून तो बाहेर आला आहे. आयपीएल स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा सुरू आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. इशांत शर्मा आमच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याचे फिट होणे आमच्यासाठी चांगली बाब आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजीची धुरा पॅगिसो रबाडा व अॅन्रीक नॉर्खिया सांभाळत आहेत. आवेश खान तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भूमिका बजावत आहे. मार्क्स स्टोयनीसचाही उपयोग केला जात आहे. उमेश यादवला अजून संधी देण्यात आलेली नाही. आगामी लढतींमध्ये इशांत शर्मासोबत उमेश यादवलाही संधी दिल्यास आश्चर्य वाटायला नको.





























































