राजस्थान भिडणार दिल्लीला, सॅमसन-पंत आमने-सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला धूळ चारली. पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर रोमहर्षक विजय मिळवला. आता दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल लढत रंगणार आहे. एकीकडे रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग दुसऱया विजयाला गवसणी घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल तर दुसरीकडे या स्पर्धेतील पहिला विजय संपादन करण्यासाठी राजस्थान रॉयल्स प्रयत्नांची शिकस्त करील.

सॅमसनचा वन मॅन शो

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दुखापतीमुळे या स्पर्धेमधून माघार घेतली. तसेच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही सध्या दुखापतीमधून बाहेरच आहे. दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सचा पाय खोलात गेला आहे. संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत खणखणीत शतक झळकावले, पण विजयापासून त्यांना दूरच रहावे लागले. आता संजू सॅमसनच्या एकटय़ाच्या जिवावर राजस्थान रॉयल्सला अवलंबून राहता येणार नाहीए. जोस बटलर, मनन व्होरा, रियान पराग यांनाही आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.

मॉरिस, तेवतिया, सकारिया यांच्याकडून आशा

राजस्थान रॉयल्सला आगामी लढतींमध्ये ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया व चेतन सकारिया या तीन खेळाडूंकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. पहिल्या लढतीत चेतन सकारिया याने प्रभावी गोलंदाजी केली होती. पण ख्रिस मॉरिस व राहुल तेवतिया यांना ठसा उमटवता आला नाही. ही निराशा मागे टाकून त्यांना नव्या जोमाने मैदानात उतरावे लागणार आहे.

अश्विन, मिश्राची फिरकी जोडगोळी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची मदार रविचंद्रन अश्विन व अमित मिश्रा या फिरकी जोडगोळीवर असणार आहे. ख्रिस वोक्स, अवेश खान, टॉम करण व मार्क्स स्टोयनीस यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. उमेश यादव, इशांत शर्मा, अक्षर पटेल यांनाही अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते.

तगडी फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत केले. या विजयात शिखर धवन, पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करीत सिंहाचा वाटा उचलला. या दोघांकडून पुन्हा एकदा त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. अजिंक्य रहाणे, मार्क्स स्टोयनीस, रिषभ पंत, शिमरोन हेथमायर यांच्या समावेशामुळे दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजी विभाग मजबूत झालाय. स्टीवन स्मिथला उद्याच्या लढतीतही बेंचवर बसावे लागू शकते.

आजची आयपीएल लढत

राजस्थान रॉयल्स-दिल्ली कॅपिटल्स (मुंबई, रात्री 7. 30 वाजता)