राजस्थान-पंजाबमध्ये झुंज! राहुल ब्रिगेडलाही विजयाची आस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या मोसमात अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर मात्र त्यांना अशी कामगिरी करता आलेली नाही. पंजाब किंग्जला तर एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आयपीएलच्या यंदा सुरू असलेल्या मोसमात उद्या याच दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आल्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार हे निश्चित आहे. लोकेश राहुलची ब्रिगेडही विजयासाठी जिवाचे रान करताना दिसेल.

रॉयल्सचे पारडे जड

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 21 लढती पार पडल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने 12 लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

पंजाब किंग्जला 9 लढतींमध्येच विजय संपादन करता आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱया लढतीआधी राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मॉरिसच्या कामगिरीवर नजरा

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या मिनी लिलावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. आता दक्षिण आफ्रिकन ख्रिस मॉरिसच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याच्यावर टाकलेला विश्वास यावेळी सार्थ ठरवण्यासाठी तो मैदानात सर्वस्व पणाला लावेल. यामुळेच त्याच्या कामगिरीकडे साऱयांच्या नजरा असतीलच. ख्रिस मॉरिस व संजू सॅमसनसह बेन स्टोक्स, जोस बटलर, राहुल तेवतिया यांच्यावर राजस्थान रॉयल्सची मदार असणार आहे.

जाय रिचर्डसन ठरणार प्रभावी

लोकेश राहुलच्या पंजाब किंग्जने मागील मोसमात उत्तरार्धात चमकदार कामगिरी केली, पण त्यांचे प्ले ऑफमधील स्थान थोडक्यासाठी हुकले. अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षणाखाली पंजाब किंग्ज चांगली कामगिरी करतोय. आयपीएलच्या या मोसमात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरण, मोहम्मद शमी व रवी बिष्णोई यांच्या कामगिरीवर संघाचे भवितव्य अवलंबून असेलच. पण या संघात यंदा एक नवा भिडू आलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन हे त्याचे नाव. त्याची कामगिरीही यावेळी चर्चेचा विषय ठरू शकते.

दोन्ही संघांचा संभाव्य चमू खालीलप्रमाणे

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर (यष्टिरक्षक), यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, बेन स्टोक्स, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, मयांक मार्पंडे.

पंजाब किंग्ज – ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), निकोलस पूरण, मनदीप सिंग, जलाज सक्सेना, मोयसेस हेनरीक्स, इशान पोरेल, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी, जाय रिचर्डसन.

कर्णधारांचा ठसा

या मोसमात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवण्यात आले आहे. लोकेश राहुल पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी कायम आहे. संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्धच्या 16 सामन्यांमध्ये 39.38 च्या सरासरीने 512 धावा फटकावल्या आहेत. 22 षटकार व 37 चौकारांची फटकेबाजी संजू सॅमसनने यावेळी केली हे विशेष. तसेच लोकेश राहुलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 9 सामन्यांमध्ये 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 खणखणीत षटकार व 35 चौकारांचा समावेश आहे.

आजची लढत

राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्ज (मुंबई, रात्री 7.30 वाजता )