IPL 2021 – 16 कोटी 25 लाख! दक्षिण आफ्रिकेचा मॉरीस ठरला महागडा खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईत गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात अष्टपैलू खेळाडूंचा बोलबाला दिसून आला. राजस्थान रॉयल्सने विक्रमी 16 कोटी 25 लाख रुपयांच्या बोलीवर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीसला आपल्या संघात घेतले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने न्यूझीलंडच्या काईल जेमिसनला 15 कोटींच्या मोबदल्यात तर ग्लेन मॅक्सवेलला 14 कोटी 25 लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याच्यावर पंजाब किंग्सने 14 कोटींची बोली लावली. हिंदुस्थानसाठी एकही लढत न खेळलेल्या कृष्णाप्पा गौतमला चेन्नई सुपरकिंग्जने 9 कोटी 25 लाख रुपयांमध्ये आपल्याकडे खेचून घेतले.

सहा वर्षांनंतर पुजारा खेळणार

चेतेश्वर पुजाराला कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. हे डोळ्यांसमोर ठेवून 2015 सालापासून 2020 सालापर्यंत कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. मात्र या वर्षी चेन्नई सुपरकिंग्जने त्याला 50 लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या संघात समाविष्ट करवून घेतले. आतापर्यंत चेतेश्वर पुजारा तीन आयपीएलमधून संघामधून खेळला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. 2014 सालानंतर तो आयपीएलमध्ये खेळलेला नाही.

अखेर हरभजन, केदार विकले गेले

हरभजन सिंग व केदार जाधव हे हिंदुस्थानचे अनुभवी खेळाडू. दोघांचीही बेस प्राईज दोन कोटी ठेवण्यात आली होती, पण पहिल्या राऊंडमध्ये दोघांवरही बोली लावण्यात आली नाही. संध्याकाळच्या सत्रात मात्र दोघांनाही बेस प्राईजच्या मोबदल्यात विकत घेण्यात आले. कोलकाता नाईट रायडर्सने हरभजन सिंगला तर सनरायझर्स हैदराबादने केदार जाधवला आपल्याकडे घेतले.

मेरेडीथ, शाहरुख झाले कोटय़धीश

ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज रायली मेरेडीथवर पंजाब किंग्जने आठ कोटींची बोली लावली. तसेच तामीळनाडूच्या शाहरुख खानलाही पंजाब किंग्जनेच आपल्या संघात घेतले. यासाठी त्यांनी 5.25 कोटींची बोली लावली. दोघांनीही आपआपल्या देशासाठी अद्याप एकही सामना खेळलेला नाही, मात्र आयपीएल लिलावात दोघेही कोटय़धीश झालेले आहेत.

अर्जुन तेंडुलकर मुंबईकडेच

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. त्याला 20 लाखांच्या बेस प्राईजवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले.