
कोरोनाचा प्रकोप ओसरत असतानाच आता बीसीसीआय संचालित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावाचे जोरदार पडघम वाजू लागले आहेत. यंदाचा 15 वा आयपीएल हंगाम हिंदुस्थानातील पुणे, मुंबई, कोलकाता, बंगुळुरू या मोठय़ा क्रिकेट केंद्रांवर रंगणार असल्याने या लीगची लज्जत अधिकच वाढणार आहे. आयपीएलचा यंदाचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरू येथे रंगणार आहे. लीगमधील 10 संघ (फ्रँचाईस) या लिलावात बोली लावणार आहेत. एकूण 561.5 कोटी रुपयांची माया साठवून ठेवली आहे. या लिलावात देशविदेशातील एकूण 590 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. त्यात 220 विदेशी क्रिकेटपटू असणार आहेत. यंदा 370 हिंदुस्थानी खेळाडूंत अंडर-19 विश्वचषकात आपल्या खेळाचा जलवा दाखवणाऱया टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनाही आपले नशीब अजमावता येणार आहे.
यांच्या खरेदीसाठी लिलावात रंगणार घमासान
यंदाच्या 15 व्या आयपीएलसाठीच्या लिलावात हिंदुस्थानी स्टार खेळाडूंच्या खरेदीसाठी दहा संघांत घमासान रंगणार आहे. या स्टार खेळाडूंत शिखर धवन, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव यांचा समावेश आहे. याशिवाय विदेशी क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन आणि वनिंदूं हंसरंगा यांना आपल्या चमूत घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि टीम अहमदाबाद हे 10 संघ लिलावात बाजी लावणार आहेत.
असे असतील खेळाडूंचे राखीव दर
- 48 प्रमुख क्रिकेटपटूंसाठी सर्वाधिक राखीव दर 2 कोटी रुपये
- 20 खेळांडूंसाठी सर्वाधिक राखीव दर 1.5 कोटी रुपये
- 34 क्रिकेटपटूंसाठी राखीव दर एक कोटी रुपये
या नवोदितांनाही मालामाल होण्याची सुवर्णसंधी
देशातील स्टार क्रिकेटपटूंसोबत सध्या अंडर-19 विश्वचषकात आपल्या पराक्रमाचा डंका वाजवणारे यश धूळ, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, होतकरू युवा खेळाडू देवदत्त पड्डीकल, हर्षल पटेल, कृणाल पांडय़ा, शाहरुख खान, दीपक हुडा, आवेश खान यांनाही यंदाच्या आयपीएल लिलावात मालामाल होण्याची संधी लाभणार आहे.



























































