IPL 2020 लिलावात ‘अनसोल्ड’ राहिलेल्या रैनाची आयपीएलमध्ये झोकात एन्ट्री, मिळाली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीगचा पंधरावा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. 26 मार्चपासून आयपीएल 2022 ची सुरुवात होणार असून सलामीलाच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ भिडणार आहे. यंदा लिलाव झाल्याने प्रत्येक संघात नवीन खेळाडू दिसणार आहेत. असे असले तरी क्रीडाप्रेमी ‘मिस्टर आयपीएल’ हे बिरुद मिरवणाऱ्या सुरेश रैना याला मिस करणार आहेत. मात्र लिलावामध्ये अनसोल्ड राहिलेल्या रैनाने आयपीएलमध्ये झोकात एन्ट्री केली आहे.

आयपीएल 2022 साठी लिलाव करण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैना याला रिलीज केले होते त्यामुळे तो लिलावात उतरला होता. मात्र सुरेश रैना यांच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. एवढेच नाही तर चेन्नई सुपर किंग्जने देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केले. रैना आता आयपीएलमध्ये दिसणार नाही असे वाटत असतानाच आता त्याने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. रैना आता एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

सुरेश रैना यंदाच्या आयपीएलमध्ये हिंदीमध्ये समालोचन करणार असल्याचे समोर आले आहे. डिज्नी स्टारचे सीईओ संजोग गुप्ता यांनी एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, सुरेश रैना यंदा आयपीएल खेळणार हे सर्वांना माहिती आहेत. परंतु आम्ही रैनाला तसेच सोडणार नाही. रैना म्हणजे मिस्टर आयपीएल असून एकेकाळी आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांमध्ये त्याचे नाव आघाडीवर होते. त्याचे कोट्यवधी पाठीराखे आहेत. या गोष्टीचा फायदा रैनाला नक्कीच होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही रैनाला हिंदी समालोचनामध्ये सहभागी करून घेणार आहोत. यासाठी आता रैना तयारीही करत आहे.

शास्त्री-रैनाची जोडी रंगणार

सुरेश रैना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत हिंदीमध्ये समालोचन करताना दिसणार आहे. शास्त्री याआधी स्टार स्पोर्टसाठी इंग्रजीमध्ये समालोचन करत होते. मात्र 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर त्यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आणि त्यांनी समालोचनाला रामराम केला. परंतु आता ते हिंदीमध्ये समालोचन करणार असून मुंबईमध्ये हिंदीचे धडेही गिरवत आहेत. त्यांच्याकडून सरावही करून घेतला जात आहे. समालोचन करताना त्यांचे हावभाव आहे तसेच रहावेत फक्त हिंदी ऐकून दर्शकांना मजा यावी, असेही गुप्ता यांनी सांगितले.

IPL 2022 – सलामीला सूर्यकुमार यादवच्या सहभागाला मुंबई इंडियन्स मुकणार!

रैनाची कारकिर्द

सुरेश रैनाने 2008 पासून 2020 सोडून प्रत्येक आयपीएल स्पर्धा खेळली आहे. त्याने या स्पर्धेत 205 लढती खेळल्या असून 5528 धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागतो. सलग आठ स्पर्धांमध्ये 300 हून अधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.