IPL 2023 राजस्थानचा 59 धावांत खुर्दा, बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणार्‍या सामन्यात बंगळुरुने राजस्थानचा अवघ्या 59 धावांमध्ये खुर्दा पाडत 112 धावांनी दणदणीत विजय मिळविला आणि आपल्या ‘प्ले ऑफ’च्या आशा पल्लवीत ठेवल्या. मात्र या पराभवामुळे गत उपविजेत्या राजस्थानवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढवले आहे.

यंदाच्या आयपीएल मोसमात ‘प्ले ऑफ’ची शर्यत दिवसें-दिवस अधिक रंगत होत चालली आहे. आयपीएलचे साखळी सामने अंतिम टप्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही संघाला प्ले ऑफचे तिकीट मिळालेले नाही. आजचा सामना हा बंगळुरू आणि राजस्थानसाठी करो या मरो स्थितीतला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीचे द्वंद पाहण्याची संधी लाभेल अशी अपेक्षा होती. नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. विराट कोहली 18 धावा करून तंबूत परतला. मात्र, कर्णधार ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी बेंगलोरच्या धावसंख्येला आकार दिला. ड्यु प्लेसिसने 44 चेंडूत 3 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावे केल्या. ड्यु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने 171 धावांचा टप्पा गाठला.

राजस्थाकडे असलेले यशस्वी जैसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसंग असे तगडे फलंदाज पाहता 172 धावांचे आव्हान तोकडे वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष चित्र काही उलटेच पहायला मिळले. आजच्या सामन्यात जैसवाल, बटलर यांना भोपळाही फोडता आला नाही. तर, सॅमसंग अवघ्या ४ धावा करून डगआऊटमध्ये परतला. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजीला अक्षरशः ग्रहण लागले. बंगळुरूचे वेन पार्नेल, मिचेल ब्रेसवेल, करण शर्मा यांच्या भेदक मार्‍यापुढे राजस्थानची फलंदाजी तग धरू शकली नाही. ज्यो रूट आणि हेटमायर वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ अवघ्या 59 धावांमध्येच तंबूत परतला. या 59 धावांमध्ये हेटमायरने एकट्याने 35 धावांचे योगदान दिले. पार्नेल याने 3 षटकांत 10 धावा देत तीन गडी बाद केले. तर, ब्रेसवेल आणि शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर, महोमद सिराज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

10 षटकांत पाला-पाचोळा

यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थानने काही सामन्यांमध्ये २०० धावांचा पाठलाग अगदी सहजपणे केला आहे. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल हा कमालीचा फॉर्मात असून, त्याला संजू सॅमसंग, जोस बटलर, हेटमायर यांची उत्तम साथ लाभत आहे. मात्र, आजच्या सामन्यात बटलर, जैसवाल शुन्यावर बाद झाल्यानंतर अवघ्या १० षटकांत राजस्थानचा संघ तंबूत परतला. राजस्थानच्या संघाचा अवघ्या ५९ धावांत पाला-पाचोळा झाला.