पंजाबचाही पराभवाचा चौकार; साई किशोरच्या फिरकी अन् तेवथियाच्या फलंदाजीमुळे गुजरातचा चौथा विजय

एकीकडे बंगळुरूला आज आपल्या सलग सहाव्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली, तर दुसरीकडे पंजाबला विजयाचा नव्हे तर सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात राहुल तेवथियाच्या झुंजार खेळामुळे गुजरातने 3 विकेट आणि 5 चेंडू राखून निसटता विजय मिळविला. गुजरातने आपल्या चौथ्या विजयामुळे सहावे स्थान मिळविले, तर पंजाब सहाव्या पराभवानंतर शेवटून दुसऱया स्थानावर कायम आहे. पंजाबचे चार फलंदाज बाद करणारा साई किशोर गुजरातच्या विजयाचा खरा मानकरी ठरला.

पंजाबच्या 143 धावांचा पाठलाग गुजरात सहज करेल असे चित्र होते, पण पंजाबच्या गोलंदाजांना शुबमन गिल आणि साई सुदर्शनला खुलून खेळूच दिले नाही. त्यामुळे 10 षटकांत त्यांचा 68 धावाच झाल्या होत्या. गिल 35 तर डेव्हिड मिलर (4) धावांवर बाद झाल्यामुळे गुजरातच्या अडचणी वाढल्या.  दोघांनीही लिव्हिंगस्टोनने बाद करून सामन्यात चुरस आणली. पुढे साई सुदर्शनही (31) बाद झाला. ओमरझाईचाही अडथळा दूर करत पंजाबने गुजरातची 5 बाद 103 अशी अवस्था करत सामन्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राहुल तेवथियाने अत्यंत हुशारीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत चौकारांची बरसात करत गुजरातला सामना काढून दिला. हर्षल पटेलने 19 व्या षटकांत राशीद खान आणि शाहरुख खानला टिपले, पण तोपर्यंत गुजरात विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचली होती आणि तेवथियाने चौकार ठोकत संघाला तो उंबरठा ओलांडून दिला.

बंगळुरूचा खेळ खल्लास; सलग सहाव्या पराभवाची नामुष्की, आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला संघ

तत्पूर्वी कर्णधार सॅम करण (20)  आणि प्रभसिमरन (35) यांच्या दमदार 52 धावांच्या सलामीनंतर पंजाबच्या डावाला जी घसरण लागली ती 142 धावांवरच थांबली. सलामीवीरांनंतर पंजाबच्या डावाला त्यांचा एकही फलंदाज सावरू शकला नाही. साई किशोरने आपल्या फिरकीवर पंजाबच्या मधल्या फळीला अक्षरशः कापून काढले. पंजाबच्या डावाला सावरणारे आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग या दोघांनी बाद करण्याची किमयाही त्यानेच दाखवली. त्यामुळे शंभरीतच त्यांचे 7 विकेट पडल्या होत्या. तेव्हा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आलेल्या हरप्रीत सिंग आणि हरप्रीत ब्रारने 40 धावांची भागी रचत संघाला सावरले. पण ही जोडीही साईने मोडली आणि 20 व्या षटकात पंजाबचा डाव 142 धावांवर आटोपला. साईने 33 धावांत 4 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली.