
‘क्वॉलिफायर-1 ‘मध्ये पंजाब किंग्जला हरवून अंतिम फेरी गाठणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कोण फायनल खेळणार? याचा फैसला रविवारी होणार आहे. बंगळुरूविरुद्ध क्वॉलिफायर-1 मध्ये झालेल्या पराभवाची निराशा झटकून पंजाब किंग्जचा संघ क्वॉलिफायर-२मध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून मनोबल उंचावलेले मुंबईचे शिलेदार पंजाबला हरवून अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार, एवढं नक्की!
पंजाब संघाला गट फेरीत अव्वल स्थान मिळाल्यामुळे फायनलमध्ये पोहोचण्याची दुसरी संधी मिळाली आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी सेमिफायनलसदृश ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर लढतीत सर्वच आघाड्यांवर सरस खेळ केला आहे. त्यामुळे पंजाबसाठीसुद्धा मुंबईला हरवणे हे मोठं आव्हानच ठरणार आहे.
पंजाबला पुनरागमन करणे आवश्यक
‘आयपीएल’चा करंडक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी पंजाबला बंगळुरूविरुद्ध झालेला लाजिरवाणा पराभव विसरून नव्या जोमाने मैदानावर उतरावे लागणार आहे. ‘नॉकआऊट’ सामन्यांमधील दडपण हताळण्याचा मुंबई इंडियन्सचा अनुभव अधिक आहे. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासमोर संघाला एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. मागील हंगामात शेवटच्या क्रमांकावर असलेली मुंबई इंडियन्स यंदा ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचली, याचे श्रेय जयवर्धने यांनाच दिले जाते. पंजाबला विजयाच्या पटरीवर आणण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांनाही आपला संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागणार आहे. अर्शदीप सिंगवर गोलंदाजीची अधिक जबाबदारी येणार आहे. शिवाय, पंजाबची फलंदाजी मागील सामन्यात सपशेल अपयशी ठरली होती. संपूर्ण संघ फक्त 101 धावांत बाद झाला होता. त्यामुळे मुंबईविरुद्ध फलंदाजीत सुधारणा करणे अत्यावश्यक ठरेल.
चहलची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून
मार्को यानसेनच्या अनुपस्थितीमुळे आणि ‘आयपीएल’मधील सर्वाधिक बळी घेणारा युझवेंद्र चहल अनुपलब्ध असल्यामुळे पंजाबच्या संघासाठी चिंता वाढली आहे. चहल पूर्णपणे फिट असल्यास त्याचा या सामन्यात समावेश होणे निश्चित आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल.
रोहित फॉर्मात परतण्याने मुंबईला दिलासा
रोहित शर्मा फॉर्मात येणे ही बाब मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक ठरली. गुजरातविरुद्धच्या ‘एलिमिनेटर’ लढतीत मिळालेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत त्याने महत्त्वपूर्ण खेळी साकारली. आता तो पुन्हा लयीत परतल्याने पंजाबच्या गोलंदाजांसाठी त्याला रोखणे आव्हानात्मक ठरेल. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वच विभागांत मजबूत दिसतो. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघ मुख्यतः रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यावर अवलंबून असेल.
संभाव्य उभय संघ
पंजाब किंग्ज – प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्लाह ओमरजाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स – जॉनी बेयरस्टॉ (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सॅण्टनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लिसन.