
IPL 2026 चा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 28 मार्च रोजी पार पडला. मात्र, या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी बेंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी मोठी कारवाई करत मोबाईल चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकबाहेरील एका टोळीने मोबाईल चोरी करण्यासाठी चक्क अल्पवयीन मुलांची मदत घेतली होती. या मुलांना विशेषतः स्टेडियमच्या आत आणि परिसरात सक्रिय राहण्यासाठी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी आतापर्यंत 18 लाख रुपये किमतीचे विविध नामांकित कंपन्यांचे 21 मोबाईल जप्त केले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन ही मुले प्रेक्षकांचे मौल्यवान फोन लंपास करत असत.
IPL 2026 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या मृत्यूवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया
बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यासोबत काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीतील इतर काही सदस्य सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरीला गेलेले 21 फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.
बेंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. 2025 च्या आयपीएल विजयानंतर काढण्यात आलेल्या ‘व्हिक्ट्री परेड’ दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती आणि 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचे सामनेही येथून हलवण्यात आले होते. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी कर्नाटक सरकारने नेमलेल्या विशेष समितीच्या तपासणीनंतरच येथे सामने खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती.



























































