
IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. वानखेडे स्टेडियमवर 221 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील रोहितचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी 2025 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने 25 चेंडूत अर्धशतक झळकावले होते, ज्याचा विक्रम आज मोडीत निघाला.
केकेआरने प्रथम फलंदाजी करत 220 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी मुंबईला वादळी सुरुवात करून दिली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत या जोडीने बिनबाद 80 धावा कुटल्या. रोहितने 38 चेंडूत 78 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भक्कम भागीदारी करून मुंबईच्या विजयाचा पाया रचला. अखेर वैभव अरोराच्या चेंडूवर अनुकूल रॉयने रोहितचा झेल टिपला आणि त्याची ही खेळी संपुष्टात आली.
अश्विन आता अमेरिकेत खेळणार, एमएलसीमध्ये ‘सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स’ क्लबशी करार
रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास, तो 2008 च्या पहिल्या हंगामापासून या लीगचा भाग आहे. सुरुवातीची तीन वर्षे तो डेक्कन चार्जर्सकडून खेळला आणि 2011 मध्ये त्याने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला. रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबईने 5 वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले आहे. आतापर्यंत खेळलेल्या 273 सामन्यांमध्ये रोहितने 7124 धावा केल्या असून, त्यात 2 शतके आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये 300 हून अधिक षटकार मारणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये रोहितचा समावेश होतो.
दोन वर्षांची बंदी अपुरी, आयपीएलमधील माघारीवर गावसकरांचा हल्ला


























































