
मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक सामना करो या मरो, असाच असणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ या सामन्यात पराभूत झाला, तर त्यांचा खेळ खल्लास होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही सामना महत्वाचा असेल. दुसरीकडे आरसीबीचा संघ हा सुस्थितीत आहे; पण गेल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक असेल.
पॉइंट्स टेबलमध्ये कशी आहे स्थिती
आरसीबीच्या संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० पैकी त्यांनी सहा सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात १२ गुण असून, ते आता तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. हा सामना जिंकून त्यांना अब्बल स्थान गाठता येऊ शकते. मुंबई इंडियन्सची पॉइंट्स टेबलमध्ये नाजूक स्थिती आहे. मुंबईचा संघ १० सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त तीनच विजय मिळवता आले आहेत. तब्बल सात सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक सामना जिंकला, तरी त्यांना अन्य संघांच्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.
मुंबईसाठी सूर्या आणि तिलकच्या फॉर्मची चिंता
मुंबईच्या संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवला आणि ते चांगल्या लयीत परतले आहेत. रोहित शमनि झोकात पुररागमन करत दणदणीत खेळी साकारली होती. रोहितबरोबर रायल रिक्लेटननेही तुफानी फटकेबाजी केली होती; पण सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना अजूनही लय सापडलेली दिसत नाही. हीच गोष्ट मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब आहे. मुंबईची गोलंदाजी अजूनही भेदक दिसत नाही. जसप्रीत बुमराह हा सातत्याने अपयशी ठरत आहे.
आरसीबीला १४ गुणांची संधी
आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. गेल्या सामन्यात विराट कोहलीला चेंडूच कळला नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला होता. विराटसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. सलामीवीर जेकब बेथेल, कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडीक्कल चांगली फलंदाजी करत आहेत. भुवनेश्वर कुमार हा गोलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम आहे, तर जोश हेझवूडची त्याला चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे आरसीबी या सामन्यात विजय साकारणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असेल.
मुंबई इंडियन्सचा कोण असेल कर्णधार
गेल्या सामन्यात हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे मैदानात उतरू शकलेला नव्हता. त्यामुळे सूर्या मुंबईचा हंगामी कर्णधार बनला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजय साकारला होता; पण विजयानंतर सूर्या हा मुंबईतच राहिला होता. कारण सूर्या आणि त्याची पत्नी यांच्या आयुष्यात कन्यारत्नाचं आगमन झालं. त्यामुळे सूर्या काही दिवस मुंबईत होता; पण तो सामन्यासाठी रायपूरला रवाना झाल्याचे समोर आले आहे. हार्दिक हा दुखापतीमधून सावरला असल्याचे म्हटले जात आहे; पण या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याची तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. या चाचणीत जर तो पास झाला, तरच त्याला संघात स्थान दिले जाईल, अन्यथा त्याला संघाबाहेर राहावे लागेल.




























































