IPL 2026 – फायनलसाठी लास्ट चान्स; राजस्थान-गुजरातमध्ये आज ‘करो या मरो’ची लढत, विजेत्याची अंतिम फेरीत आरसीबीशी टक्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या रणधुमाळीत शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातक्वालिफायर-2ची लढत रंगणार आहे. अंतिम फेरीचे तिकीट अवघ्या एका पावलावर असताना दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. जो संघ जिंकेल तो आरसीबीशी अंतिम फेरीत लढेल.

क्वालिफायर-1मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का बसला होता, तर राजस्थानने एलिमिनेटरमध्ये हैदराबादला अक्षरशः चिरडत दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे राजस्थानचा आत्मविश्वास सध्या गगनाला भिडलेला आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलमधील प्रत्येक गोलंदाजासाठी कोडं ठरत आहे. हैदराबादविरुद्ध अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांची तुफानी खेळी करत या 15 वर्षीय फलंदाजाने क्रिकेटविश्व हादरवून सोडले. जसप्रीत बुमरापासून पॅट कमिन्सपर्यंत कोणत्याही गोलंदाजाची भीती न बाळगणारा वैभव पुन्हा एकदा गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडण्यास सज्ज आहे.

मागील सामन्यात मोहम्मद सिराजने शॉर्ट चेंडूवर वैभवला बाद केले होते. मात्र, त्याआधी वैभवने त्याच्यावर खणखणीत षटकार ठोकला होता. कगिसो रबाडालाही त्याने सोडले नव्हते. त्यामुळे वैभवला रोखण्यासाठी गुजरातचे गोलंदाज शॉर्ट
बॉलचा डाव आखण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या यशामध्ये वैभवसोबत जोफ्रा आर्चरचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ध्रुव जुरेलने तिसऱया क्रमांकावर दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे राजस्थान आपल्या विजयी संघात बदल करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

गुजरातची गोलंदाजी ही त्यांची ताकद मानली जाते. मात्र आरसीबीविरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये त्यांचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते. रजत पाटीदारने त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. क्षेत्ररक्षणातही गुजरातला सुधारणा करावी लागणार आहे.

गुजरातची फलंदाजीची भिस्त तिघांवरच

गुजरातची संपूर्ण मदार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या त्रिपुटावर आहे. हे तिघे अपयशी ठरले तर गुजरातची फलंदाजी कोलमडते. साई सुदर्शन सातत्यपूर्ण खेळ करत असला तरी सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी त्याच्या स्वभावात नाही. त्यामुळे मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करताना गिलवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवान फरेरा, दासुन शनाका, रवींद्र जाडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, बृजेश शर्मा, यश राज पुंजा.

गुजरात टायटन्स – साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिद्धू, जेसन होल्डर, राशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.