
मंगेश वरवडेकर
अखेर मुंबई इंडियन्सने आपल्या विजयाची गुढी उभारली. पराभवाच्या हॅटट्रिकमुळे खचलेल्या मुंबई इंडियन्सच्या जिवात जान आणण्याची किमया शेफर्ड रोमारिओच्या झंझावाताने करून दाखवली. मुंबई इंडियन्सच्या 234 धावांच्या आव्हानाचा दिल्ली कॅपिटल्सने शेवटपर्यंत पाठलाग केला, पण ते लक्ष्यापासून 29 धावा दूरच राहिले. अखेर तीन पराभवांनंतर मुंबईने विजयारंभ करत आयपीएल गुणतालिकेत आपल्या गुणांचे खाते उघडले.
मुंबईच्या 235 धावांच्या आव्हानाचा दिल्लीने जबरदस्त पाठलाग केल्यामुळे आजही थरारक सामना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार हे स्पष्ट होते आणि झालेही तसेच. आज ‘आयपीएल किंग’’ डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरला, पण पृथ्वी शॉने आपला शो दाखवला. त्याने अभिषेक पोरेलच्या साथीने 8 षटकांत 88 धावांची भागी रचत मुंबई इंडियन्सच्या पायाखालची जमीनच सरकवली होती. या भागीमुळे आयपीएलमध्ये अशक्य काही नसल्याचे चित्र पुन्हा एकदा उभे राहिले होते. शॉने मुंबईची गोलंदाजी फोडून काढताना 40 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकार मारत 66 धावा काढल्या होत्या.
स्टब्सने शेफर्डच्या 19 व्या षटकांत 3 षटकार ठोकत दिल्लीला विजयाची अंधूक आशा दाखवली. पण जिराल्ड कोत्झीच्या विसाव्या षटकात स्टब्सला स्ट्राइकच येऊ दिली नाही आणि दिल्लीचे तीन फलंदाज बाद करत मुंबईच्या 29 धावांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोत्झीने 34 धावांत 4 विकेट टिपल्या तर स्टब्सने 25 चेंडूंत 7 षटकार आणि 3 चौकार लगावत नाबाद 71 धावा केल्या.
रोहित–इशानची दमदार सलामी
आज मुंबईला रोहित शर्मा आणि इशान किशनने दमदार सलामी देताना 7 षटकांत 80 धावा काढून दिल्या. रोहितचे अर्धशतक एका धावेने हुकले, अक्षर पटेलने त्याचा अफलातून त्रिफळा उडवत दिल्लीने पहिले यश मिळवून दिले. त्याआधी रोहितने 3 षटकार आणि 6 चौकार ठोकले. चार महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या सूर्यकुमार यादव इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तिसऱया स्थानावर आला आणि भोपळा न फोडताच बाद झाला.
एका धावेत 2 धक्के बसल्यानंतर इशान सुस्साट सुटला, पण अक्षर पटेलने स्वतःच्याच गोलंदाजीवर इशानच्या बुलेट शॉटला एका हाताने झेलत आपले दुसरे यश मिळवले. त्यानंतर हार्दिक पंडय़ा, तिलक वर्मा यांनी मुंबईची धावगती खाली आणण्याचे काम केले. पंडय़ा आणि टीम डेव्हिडने 60 धावांची भागी रचली, पण पंडय़ाने 33 चेंडूंत 39 धावा काढल्यामुळे मुंबईने 18 षटकांत 181 धावा केल्या होत्या.
बुमराने सामना फिरवला
शॉचा झंझावात थांबायचे नावच घेत नव्हता. तेव्हा पंडय़ाने बुमराच्या हातात चेंडू दिला आणि त्याने जादू केली. बुमराच्या भात्यातून निघालेल्या अचूक यॉर्करने शॉला त्रिफळाचीत करून हवेत असलेल्या दिल्लीला जमिनीवर आणले आणि पुढच्याच षटकात पोरेलही बाद करून दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले. या हादऱयानंतर दिल्ली काहीशी मागे पडली. शेवटच्या 5 षटकांत 91 धावांची गरज असताना ऋषभ पंत, अक्षर पटेलकडून खूप अपेक्षा होती, पण दोघेही अपयशी ठरले. बुमराने आपल्या चौथ्या षटकातही केवळ 4 धावा दिल्या आणि दिल्लीला विजयापासून लांबच ठेवण्याचे काम फत्ते केले. त्याने केवळ 22 धावा देत 2 विकेट घेतले. मात्र मैदानात उभ्या असलेल्या ट्रिस्टन स्टब्सने मुंबईच्या गोलंदाजांना स्तब्ध करणारी फलंदाजी करत दिल्लीला विजयाच्या ट्रकवर आणण्यासाठी संघर्ष केला.
तुफान आलंया…
पंडय़ाच्या संथ खेळीमुळे मुंबई दोनशेचाही पल्ला गाठणार नाही असे चित्र उभे राहिले, मात्र वानखेडेवर शेवटच्या आठ चेंडूंत अक्षरशः तुफान आलं होतं. आधी टीम डेव्हिडने इशांत शर्माच्या 19 व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर षटकार-चौकार ठोकला. त्यानंतर रोमारिओ शेफर्डने ऍनरिक नॉर्कियाच्या षटकात अशी घणाघाती फलंदाजी केली की, वानखेडेवर तुफान आल्याचा अनुभव तमाम प्रेक्षकांनी अनुभवला. रोमारिओने चौकार-षटकारबाजी करत 4, 6, 6, 6, 4, 6 अशा फटक्यांसह 32 धावा चोपून काढल्या. रोमारिओच्या या फटकेबाजीमुळेच मुंबई अनपेक्षितपणे 234 धावांपर्यंत पोहोचू शकली. रोमारिआने 10 चेंडूंत 39 तर डेव्हिडने 21 चेंडूंत 45 धावा ठोकल्या. दोघांनी चक्क 8 षटकारांची बरसात केली. एवढेच नव्हे तर 13 चेंडूंत 53 धावांची आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकी भागी रचली.
18 हजार विद्यार्थ्यांनी अनुभवला थरार
आज वानखेडेवरचा थरार अनुभवण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून तब्बल 18 हजार शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. दोन्ही डावांत झालेल्या षटकारबाजीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. गेली 14 वर्षे फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा नीता अंबानी यांच्या पुढाकाराने आयपीएलदरम्यान सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ (एज्युकेशन ऍण्ड स्पोर्ट्स फॉर ऑल) हे अभियान राबवले जात आहे. ज्याचा विद्यार्थी मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र यंदाही दिसले.




























































