IPL 2026 – मुंबई विरुद्ध कोलकाता लढतीनंतर BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा गूढ मृत्यू, मरीन ड्राईव्हच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगला. या लढतीत विजय मिळवत मुंबईने 13 वर्षांपासून सलामीचा सामना गमावण्याचा पायंडा मोडीत काढला. हा सामना संपल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बीसीसीआयशी संबंधित असलेल्या ब्रिटीश नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) आयपीएलचे ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एका ब्रिटीश नागरिकाचा मृतदेह मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला. इयान विल्यम्स लँगफोर्ड (वय – 76) असे मृत व्यक्तीचे नाव असून आयपीएल सामन्यांच्या कव्हरेजसाठी ते 24 मार्चपासून या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

हॉटेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी सामना संपवून लँगफोर्ड त्यांच्या खोलीत (क्रमांक 2715) परतले होते. दुसऱ्या दिवशी 30 मार्च रोजी जेव्हा रिसेप्शनिस्टने त्यांच्या खोलीत फोन केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा लँगफोर्ड जमिनीवर निपचित पडलेले आढळले. हॉटेलच्या इन-हाउस डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ‘इंडिया टीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.