कोलकाता, बंगळुरू संघांत बदली खेळाडूंची एण्ट्री

आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेला गतविजेता कोलकाता व रविवारीच प्ले ऑफमधील स्थान निश्चित केलेला बंगळुरू या दोन संघांत बदली खेळाडूंची एण्ट्री झाली आहे. कोलकात्याच्याच संघ व्यवस्थापनाने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू रोवमन पॉवेलच्या जागी मध्य प्रदेशातील युवा फिरकीवीर शिवम शुक्लाचा संघात समावेश केला आहे, तर बंगळुरूने लुंगी एनगिडीच्या जागी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीला संघात स्थान देण्यात आले.

रोवमन पॉवेल आणि इंग्लंडचा मोईन अली हे दोघेही वैद्यकीय कारणांमुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, हे कोलकाता संघाने आधीच कळवले होते. पॉवेल आयपीएलमध्ये पुढे सहभागी होऊ शकणार नाही, हेदेखील त्यांनी ‘बीसीसीआय’ला सांगितले होते. त्यामुळे पॉवेलच्या जागेवर कोलकात्याने शिवम शुल्काला 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केले. मात्र, कोलकाता संघाचा आता लीग टप्प्यातील केवळ शेवटचा सामना बाकी आहे. 25 मे रोजी दिल्लीत हैदराबादविरुद्ध होणाऱया या लढतीत शिवम शुक्लाला संधी मिळते की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. दुसरीकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी लुंगी एनगिडीला 26 मेनंतर दक्षिण आफ्रिका संघात दाखल व्हायचे आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर बंगळुरूने झिम्बाब्वेचा प्रमुख वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला 75 लाख रुपयांच्या मोबदल्यात संघात घेतले आहे. मुजरबानी हा 26 मेनंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. झिम्बाब्वेला हा प्रतिभावान गोलंदाज अद्याप आयपीएलमध्ये खेळला नसला तरी लखनौच्या संघाकडून त्याने नेट सरावात गोलंदाजी केलेली आहे, मात्र मुजरबानी हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळलेला आहे. हा प्रतिभावान गोलंदाज बंगळुरूसाठी लकी ठरू शकतो.